Satara Crime – खासदार, पीए, पोलीस अधिकारी आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय; महिला डॉक्टरनं जीवन संपवलं की व्यवस्थेने खून केला?

सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. ज्या पोलिसांना जनतेचे सेवक मानलं जातं त्याच पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार केल्याचं, महिला डॉक्टरने हातावर लिहून ठेवलं आहे. बीडची रहिवासी असल्याने वारंवार टोमने मारले जात असल्याचं महिला डॉक्टरने चार पाणी पत्रामध्ये लिहिलं आहे. मागील एक वर्षांपासून पोलिसांचा आणि राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचं पत्रामध्ये लिहिलं आहे. अखेर महिला डॉक्टरने जीवन संपवून या जाचातून आपली सुटका करून घेतली. मात्र, संतप्त सामान्य नागरिकांनी, हा व्यवस्थेने केलेला खून असल्याचा आरोप करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

आत्महत्येचा इशारा देऊनही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरवर गेल्या वर्षभरापासून राजकीय नेत्यांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता. तसेच हवा तसा शवविच्छेदन अहवाल (Post Mortem Report) देण्यासाठी सुद्धा दबाव टाकला जात होता. या सर्व जाचामुळे महिला डॉक्टर तणावात होत्या. अशातच गेल्या काही महिन्यांपासून पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील एका अंतर्गत वादात त्या अडकल्या होत्या. तपासणी सुरू असताना झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे त्या प्रचंड मानसिक दबावाखाली होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सुद्धा त्यांनी दिली होती. “माझ्यावर अन्याय होत असून मी आत्महत्या करीन,” असा इशारा या पत्रामध्ये देण्यात आला होता. परंतू अधिकार्‍यांनी कारवाई केली नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी चार पानी पत्र लिहिले

NDTV मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानी पत्राद्वारे आपल्यावर होत असलेल्या छळाचा खुलासा केला आहे. या पत्राद्वारे करण्यात आलेल्या खुलास्यानुसार संतापजनक बाब म्हणजे महिला डॉक्टरला बीडची असल्याने हिणवलं जात होतं, दुय्यम वागणूक दिली जात होती. आणि ही वागणूक देणारे दुसरे तिसरे कोणी नसून पोलीस होते, असं पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे आत्महत्येला कारणीभूत असल्याच म्हटलं आहे. तसेच गोपाळ बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप सुद्धा महिला डॉक्टरने केला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे एका खुनाच्या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव आणला जात होता. दबाव आणणाऱ्यांमध्ये एक खासदार आणि त्यांच्या पीएंचा सुद्धा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे.

हा व्यवस्थेने केलेला खून?

या खळबळजनक घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे आणि नावं पुढे येतीलचं. तत्पूर्वी सामान्य माणसांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे, असा आरोप सोशल मीडियाद्वारे नागरिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.