Satara Doctor Case – दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात, तपास कुठपर्यंत आला! पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे (Satara Doctor Case) यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी आणि महिला डॉक्टर या एकमेकांच्या संपर्कात असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर 2025) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

सुसाईड नोटच्या आधारावर दोन आरोपींना अटक

डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर दोन आरोपींची नावे लिहिली होती. सर्व प्रकार जेव्हा उजेडात आला, तेव्हा दोघेही गायब होते. मात्र, पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारावर दोन्ही आरोपींना अटक केली असून दोघेही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. “सुरुवातीला डिजिटल इव्हिडंस तपासण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवाल मिळाला आहे. दोन्ही आरोपी आणि डॉक्टर तरुणी यांचे मोबाईल तपासले असता डॉक्टर तरुणी दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती.” अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली.

भाड्याच्या खोलीत राहत असताना लॉजवर का गेली?

पीडित डॉक्टर तरुणी एका भाड्याच्या खोलीत राहत होती. मात्र, तिचा मृतदेह लॉजवर आढळून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. “ती एका भाड्याच्या खोलीत राहत होती. असे असताना ती लॉजवर गेली. तिथे जाताना तो रूम तिनेच बुक केल्याचं समोर आलं आहे. तिने असं का केलं? ती तिथे कशासाठी गेली होती? तिथे तिला कुणी भेटलं का? या प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधत आहोत.” असी माहिती तुषार दोशी यांनी दिली.

लॉजवर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध

“पीडित डॉक्टर तरुणी जेव्हा लॉजवर गेली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्यात कुठल्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसून येत नाही. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार तिने रात्री दिडच्या सुमारास आत्महत्या केली आहे. त्या दृष्टीने आता पुढील तपास सुरू आहे.” असे तुषार दोषी यांनी यावेळी सांगितले.