Radha Buffalo Satara – माण तालुक्यातील ‘राधा’म्हशीची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद

माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’म्हैशीची (Radha Buffalo Satara) सध्या देशात नव्हे तर जगभरात चर्चा आहे. उंचीने कमी असणारी ही म्हैस सध्या शेतकर्‍यांसह सर्वांच्या आकर्षणांच केंद्रबिंदु ठरत आहे. त्यातच तिची आता जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून Guinness Book of World Record मद्ये नोंद झाली आहे. ‘राधा’ची उंची फक्त 83.8 सेंमी इतकी म्हणजेच 2 फुट 8 इंच असून वजन 314 किलोच्या आसपास आहे. 

मलवडीत जन्म ते गिनीज बुकात नोंद

माण तालुक्यातील मलवडी गावातील शेतकरी त्रिंबक बारोटे यांच्या घरातील म्हशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी ‘राधा’म्हशीचा जन्म झाला. मात्र, सुरुवातीला त्यांना म्हशीमध्ये फारसा बदल जाणवला नाही. म्हैस दोन-अडीच वर्षांची झाल्यानंतर ‘राधा’च्या उंचीतील फरक त्यांना जाणवला. त्यानंतर कृषी पदवीधर झालेला मुलगा अनिकेतने राधाला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला अपयश आलं. मात्र, 21 डिसेंबर 2024 पासून ‘राधा’म्हशीसह बोराटे कुटुंबाची गाडी सुरुळीत ट्रॅकवर धाऊ लागली.

सोलापूरात पार पडलेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात ‘राधा’ने सर्वांना आकर्षित केलं आणि महाराष्ट्रात तिच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर पुसेगाव, निपाणी (कर्नाटक) अशा राज्यातील अनेक कृषी पदर्शनात ‘राधा’ने सर्वांनाच भुरळ पाडली. जवळपास 13 कृषी प्रदर्शनात तिला आमंत्रित करण्यात आले. ‘राधा’ ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे बोराटे कुटुंबाला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. फ्री प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

  • 24 जानेवारी 2025 रोजी ‘राधा’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
  • 28 ऑक्टोबर 2025 ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

“आमच्या घरात देवी लक्ष्मीचे रूप असलेली आमची ‘राधा’ प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, सामान्य शेतकऱ्यांसाठी तसेच अनेकांसाठी ती आकर्षणाचे केंद्र बनत आहे. ‘राधा’ची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही आता ‘राधा’सोबत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची योजना आखत आहोत,” असे अनिकेत बोराटे यांनी ‘नवशक्ती’शी बोलताना सांगितले.