कराडमध्ये बाप-लेकाच्या नात्यात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे. लोकन्यायालयाच्या निमित्ताने दोघेही तब्बल चार वर्षांनी एकत्र आले आणि आपापली चूक मान्य करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. मागील चार वर्षांत बाप-लेकाने एकमेकांच तोंडही पाहिलं नाही, दोघांमाधला वाद इतका विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल केले होते. परंतु आता दोघांनी सर्व खटले काढून टाकले आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. चार वर्षांचा अबोला लोकन्यायालयात संपुष्टात आला. हा भावनिक क्षण पाहून न्यायाधीशांचेही डोळे पाणावले.
अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी सुदाम वेंकट जाधव आणि त्यांचा मुलगा राजेश सुदाम जाधव यांच्यात काही कारणांमुळे वाद निर्माण झाला होता. आणि वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे दोघांनी एकमेकांविरुद्ध फौजदारी व दिवाणी खटले दाखल केले होते. दोघांमध्ये समेट होण्याची शक्यता फार कमी होती. परंतु न्यायाधीश आणि पक्षकरांचे विधिज्ञ आर.पी. गांधी, ओमकार पाटील व दीपक पवार यांनी या बाप-लेकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. याव्यतिरिक्त कराडच्या लोकन्यायालयात तब्बल सहा कोटी 18 लाखांच्या तडजोडीसह काही दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आली. जवळपास 696 केसेस या सामंजस्याने मिटल्या गेल्या.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी, दिलीप भा. पतंगे यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात अपघात प्राधिकरण, धनादेश अनादर, तडजोडीपात्र खटले आणि दावे या प्रकरणांचा समावेश होता. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात आणि सर्व वकील सदस्यांनी लोकन्यायालयात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि अनेक दुरावलेल्या नात्यांना पुन्हा एकत्र आणलं.