Satara News – पगार आम्हाला पुरेना; मुद्रांक विभागातील महिला लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं

Satara News सामान्य माणसांची ज्या पद्धतीने पिळवणूक करत येईल, त्या सर्व पद्धतींचा अवलंब करून सध्या सामान्य माणसांची पिळवणुक सुरू आहे. छोट्या छोट्या कामांसाठी सरकारी कर्मचारी सामान्यांना गृहित धरत आहेत. काम पूर्ण करून घेण्यासाठी पैशांची मागणी करत आहेत. परंतु आता सामान्य माणूस सुद्धा जागरूक झाला आहे. त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांना चांगलाच दणका बसत आहे. असाच दणका आता सहजिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक पल्लवी रामदास गायकवाड (कारंडे) यांना बसला आहे. 5 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बहीण-भावामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होता. हा वाद कोर्टापर्यंत गेला होता. साताऱ्यातील दिवाणी न्यायालयात या प्रकरणावर दावा सुरू होता. परंतु बहीण आणि भावाने तडजोड केल्यामुळे तडजोडनामा घेऊन दोघे सैदापूर ग्रामपंचायतीमध्ये गेले. त्यानंतर ग्रामपंचायतीने सदर हुकुमनामा मुद्रांकित करून आणण्यास सांगितला. त्यामुळे दोघे बहीण-भाऊ हकुमनामा मुद्रांकित करण्यासाठी सातारा तहसील परिसरातील सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता. तिथल्या लिपीक पल्लवी गायकवाड यांनी तक्रारदारांकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.

लाच मागितल्यानंतर तक्रारदारांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लिपीक पल्लवी गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दिली. आणि बुधवारी (23 जुलै 2025) पैसे घेताना पल्लवी गायकवाड रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. पुढील कारवाई पोलीसांच्या माध्यमातून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात कुठेही कोणी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.