सातारा (Satara News) जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात मागील २४ तासांत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दि. १९ रोजी सायंकाळी सातारा जिल्हा बँकेत मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये अडीच-अडीच वर्षांच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजपसमोर मांडण्यात आला. यावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कळवण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर घटनांना वेग आला. रात्री २.३० वाजता अपहरणाच्या तक्रारीनंतर काही सदस्य महाबळेश्वर पोलीस ठाण्यात हजर झाले, तर ३ वाजता राष्ट्रवादीचा एक सदस्य वाई पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला. सकाळी १० वाजता भाजपकडून प्रतिसाद न आल्याने राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सकाळी ११.३० वाजता पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेत येत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ११.४५ वाजता भाजपच्या सदस्यांना घेऊन खासगी वाहन जिल्हा परिषदेत दाखल झाले. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सदस्यांना आत नेले. काही वेळातच शिंदेसेना-राष्ट्रवादीचे सदस्यही मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहोचले. मात्र, शशिकांत शिंदे यांना प्रवेशद्वारातच रोखण्यात आले, तर अनिल देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेत महाबळेश्वरला नेले.
दुपारी १ नंतर राजकीय समीकरण स्पष्ट झाले. भाजपने बहुमत सिद्ध करत प्रिया शिंदे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड निश्चित केली. यानंतर दुपारी ३ वाजता शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. संपूर्ण घडामोडींमुळे साताऱ्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.