साताऱ्यामध्ये (Satara Rain Update) पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धोम धरण, बलकवडी धरण आणि कोयना धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा व कराड तालुक्यातील सर्व शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि गुरुवार (21 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
सातऱ्यासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस कोसळला आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सातऱ्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी आणि गुरुवारी वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि कराड तालुक्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील पावसाची परिस्थिती पाहून तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सातारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.