Satara Vishesh – पत्नीशी भांडण झालं, 24 वर्षीय तरुणाने अजिंक्यताऱ्यावर जीवन संपवण्याचा केला प्रयत्न

सातारा (Satara Vishesh) जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका 24 वर्षीय तरुणाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शिताफीने त्याची समजून काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (7-08-2025) दुपारी 4 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. किल्ले अजिंक्यतारा येथील दक्षिण दरवाजा येथे एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्धेशाने आल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक तयार करून किल्ल्यावर पाठवले. किल्ल्यावर पथक पोहोचले असता कड्यावर आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेला तरुण त्यांना दिसला. त्यानंतर जवळपास अर्धातास त्याची समजूत काढण्यात आली. पोलिसांनी शिताफीने त्याची समजूत काढली आणि त्याला कड्यावरून सुरक्षित ठिकाणी नेलं. त्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले व कुटुंबीयांना फोन करून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पत्नीसोबत झालेल्या वादातून त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.