Shiv Temple Near Mumbai आपला भारत देश अनेक रुढी परंपरा, सण -समारंभांनी नटलेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवाचे नियोजन केलेले आहे. यातलाच तुमचा आमचा सर्वांचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे… याचाच अर्थ सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते त्यामुळे मन प्रसन्न असतं. देशाच्या विविध भागात अशाच पद्धतीने त्या भागातील पद्धतीनुसार सण साजरे केले जातात.
विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये केले जातात. भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे. या काळात महादेवाची पूजा केली जाते. महादेवाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तुम्हालाही महादेवांची पूजा करायची आहे का? चला तर मग जाणून घेऊया मुंबई आणि मुंबईच्या जवळपास असणारी प्रसिद्ध शिव मंदिरे जेथे जाऊन तुम्ही मनोभावे भगवान शंकराची पूजा करू शकता…
अंबरनाथचे शिवमंदिर

महाराष्ट्रातील ठाणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या अंबरनाथ शहरात असलेले हे एक प्राचीन शिवमंदिर मंदिर आहे. हे मंदिर 11 व्या शतकात बांधले गेले आणि ते भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर अंबरेश्वर शिव मंदिर किंवा पुरातन शिवालय म्हणूनही ओळखले जाते.
कोपिनेश्वर मंदिर
कौपिनेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक मंदिर आहे. या मंदिराला ठाण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे.मंदिराच्या आतील शिवलिंग हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग मानले जाते.हे मंदिर शिलाहार राजवटीत बांधले गेले असून यामध्ये 12 फूट व्यासाचे आणि 4 फूट 3 इंच उंचीचे शिवलिंग आहे.
बाबुलनाथ मंदिर
बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे. दरवर्षी महाशिवरात्री उत्सवात लाखो भाविक मंदिरांना भेट देतात.
वाळकेश्वर मंदिर (बाणगंगा मंदिर)
वाळकेश्वर मंदिर किंवा बाणगंगा मंदिर हे दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात स्थित आहे.मुंबईतील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिरासोबतच येथे बाणगंगा तलाव देखील आहे.