Wai News – मराठी शाळा म्हणजे संस्कारांची शिदोरी! न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव-नांदगणे येथे प्रवेशोत्सव जल्लोषात

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पाया रचणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपत आहेत. याच शिक्षण संस्कृतीचा उत्सव साजरा करत वाई (Wai News) तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव व भागशाळा नांदगणे येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साह, आनंद आणि जल्लोषात संपन्न झाला.

दिनांक १५ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर उत्साही वातावरणाने भारून गेला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष नारायण वाडकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांच्या आकर्षक मिरवणुकीने झाली. औक्षण, पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक संतोष वाडकर यांनी प्रास्ताविकातून प्रवेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोरगावचे सरपंच दत्तात्रय वाडकर यांनी नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शशिकांत बापू वाडकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देत उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात एन. जी. वाडकर यांनी शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर प्रगती साधावी, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच खाऊ वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विजय वाडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजित वाडकर यांनी मानले.

विशेष म्हणजे, इयत्ता पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात अधिक रंगत आणली. अशा उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात प्रवेशोत्सव २०२६-२७ कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!