वाई (Wai News) पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण २७ मोबाईल फोन शोधून काढले असून, अंदाजे ५ लाख ४० हजार रुपये किंमतीचे हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाई शहरात मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हे मोबाईल शोधून काढले. त्यानंतर सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
वाई हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे प्रवासादरम्यान किंवा बाजारपेठेत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण ३५७ मोबाईल शोधून संबंधितांना परत दिले आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस कर्मचारी विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम आणि श्रावण राठोड यांनी सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.