U23 Athletics Competition – जावळीच्या सुदेष्णाची ‘सुवर्ण’ झेप; पदकांची हॅट्रिक आणि दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड

वारंगळ (तेलंगणा) येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत (U23 Athletics Competition) जावळीच्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. फक्त सुवर्णपदकच जिंकले नाही तर दक्षिण आशियाई वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड सुद्धा झाली आहे. सुदेष्णाने या सुवर्णपदकासह पदकांची हॅट्रीक पूर्ण केली असून साताऱ्यासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

जावळी तालुक्यातील खर्शी हे सुदेष्णा शिवणकर हीचे जन्मगाव आहे. सुदेष्णाच्या धमाकेदार कामगिरीमुळे खर्शी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सुदेष्णाचा सातत्यपूर्ण सराव व तिच्या या संपूर्ण प्रवासात प्रशिक्षक बळवंत बाबर, वडील हणमंत आणि आई प्रतिभा शिवणकर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत सुदेष्णा हणमंत शिवणकर या नावाची जोरदार चर्चा आहे. आता सुदेष्णा 24 ते 26 ऑक्टोबर 2026 या कालावधीत झारखंडमधील रांची येथे होणार्‍या दक्षिण आशियाई वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. या स्पर्धेतही तिच्याकडून सर्वांना पदकाशी अपेक्षा असणार आहे.

62 पदकांची लयलूट आणि हॅट्रिक

सुदेष्णाने वयाच्या 13 व्या वर्षी सुरू केलेला आपला हा प्रवास मेहनत, सराव आणि प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखील सुसाट सुरू आहे. तिच्या या नऊ वर्षांच्या प्रवासात तिने आतापर्यंत 62 पदकांना गवसणी घातली आहे. तसेच सलग तीन स्पर्धांमध्ये पदक जिंकून तिने पदकांची हॅट्रिक सुद्धा साकार केली आहे. उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक, रांची येथील सीनियर नॅशनल अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर शर्यतीत रौप्य आणि आता गुरुवारी (16 ऑक्टोबर 2025) वारंगळ येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.