परिस्थितीला झुकवण्याची क्षमता ठेवणारे अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीत घडले आणि आजही घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राची माती पवित्र झाली आहे. याच पवित्र मातीमध्ये पुण्यातील 17 वर्षीय कुस्तीपटू सनी फुलमाळी (Sunny Fulmali Success Story) याने इतिहास घडवला आहे. रहायला घर नाही, वडील नंदीबैल घेऊन घरोघरी जात भविष्य सांगण्याचे काम करता. हलाखीची परिस्थिती असतानाही सनीने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले आहे.
बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू सनी फुलमाळी याने कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे फुलमाळी कुंटुंबासह पुण्यात आणि बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सनीचा सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास लाखो तरुणांना प्रेरणा देणारा आहे. झोपडी ते सुवर्णपदक हा प्रवास फक्त त्याच्या एकट्याचा नाही, तर त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाचा सुवर्ण प्रवास आहे.
बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये स्थलांतर
सनी फुलमाळी आणि त्याचे कुटुंब हे मुळ बीड जिल्ह्यातील छोट्याशा गावातलं आहे. गावामध्ये उदरनिर्वाहाचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे फुलमाळी कुटुंबाने बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये आपला मोर्चा वळवला. पुण्यामध्ये चार भिंतींच घर नसतानाही फुलमाळी कुटुंब पुण्यात आलं आणि एका झोपडीवजा घरातून आपला नवीन शहरातला नवा प्रवास सुरू केला. घर छोटं होतं पण सनीने उराशी बाळगलेलं स्वप्न त्याहूनही मोठं होतं. त्याच्या या स्वप्नांना आई-वडिलांनी पाठिंबा दिला. वडील नंदी बैल घेऊन गावोगावी भविष्य सांगण्याचे काम करू लागले आणि आईने सुद्धा त्यांना पाठिंबा देत सुया-दाभण विकण्याचा छोटा धंदा सुरू केला. दोघांनी मिळून संसाराचा गाडा रेटला आणि सनीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी जीवाच राण केलं. त्याच्या स्वप्नांना त्यांनी बळ दिलं.
कुस्तीच्या नवा अध्यायाला सुरुवात
सनीला चांगलं आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावं म्हणून सनीच्या वडिलांनी हालचाल सुरू केली आणि त्याला लोहगाव येथील वस्ताद सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांच्या रायबा तालमीत कुस्तीचे बारकावे शिकण्यासाठी धाडलं. सनीने मेहनत घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जीव तोडून मेहनत घेतली आणि त्याची खेळाडू वृत्ती पाहून त्याला लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात दाखल करण्यात आले. जाणता राजा कुस्ती केंद्रात वस्ताद संदीप भोंडवे यांनी त्याला दर्जेदार मार्गदर्शन दिले.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्ण झेप
बहरीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी सनी फुलमाळी मिळाली. सनी 60 किलो वजनी गटातून मैदानात उतरला आणि त्याने दैदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. सनीचे हे यश फक्त त्याच्यापूर्ते मर्यादित नाही. तर हे यश त्याचे आई-वडील आणि सर्व प्रशिक्षकांनी त्याच्यावर घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. सनीच्या यशामुळे लोहगावसह पुणे आणि बीड जिल्हातून सुद्धा त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
सनीला आता आधुनिक आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळवण्यासाठी विशेष मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.