ICC Women’s World Cup 2025 – भारताच्या पोरी जगात भारी, टीम इंडियाने द.आफ्रिकेला नमवत पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला

पावसाचा व्यत्यय, चाहत्यांचा जल्लोष आणि टीम इंडियाच्या नावाचा जयघोष. नवी मुंबईचं डी.वाय.पाटील स्टेडियम चाहत्यांनी दणाणून सोडलं. निमित्त ठरला टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगलेला ICC Women’s World Cup 2025 च्या फायनलचा थरार. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाने बाजी मारत वर्ल्ड कप उंचावला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार लॉरा वॉल्वार्ड्टने एकाकी खिंड लढवली. तिने 98 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत 101 धावांची धुवांधार खेळी केली. टीम इंडियाच्या अडचणी लॉराने वाढवल्या होत्या. मात्र, दीप्ति शर्माने तिला बाद केल आणि सामना टीम इंडियाच्या बाजून खेचून आणला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि वर्ल्ड कप उंचावला. विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षांनी महिला वर्ल्ड कपमध्ये जगाला नवा विजेता मिळाला.