आपला भारत विविध भाषा आणि जाती धर्मांच्या लोकांनी नटलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये अनेक परंपरा, उत्सव, रीतिरिवाज, चालीरिती यांचं मिश्रण पाहायला मिळत. सर्व जाती धर्मातील लोकं एकमेकांच्या उत्सवामध्ये आवर्जून सहभागी होतात. त्याचबरोबर सर्व समुदायांमध्ये काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यातल्या त्यात मासिक पाळी (menstruation) बद्दलचे काही गैरसमज आजही महिलांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरत असल्याच पाहायला मिळत आहे. मासिक पाळीशी संबंधित अनेक परंपरांचे आजही भारतातल्या काही ग्रामीण भागांमध्ये पालन केलं जात. अशीच एक परंपरा म्हणजे मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर तीचं लग्न (Tuloni Biya) एका केळीच्या झाडाशी लावलं जात. काय आहे ही परंपरा? काय आहे यामागचे कारण? चला जाणून घेऊया.
भारताच्या इशान्येकडील राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या प्रदेशातील आसाम राज्यातील बोगांइगाव जिल्ह्यातील सोलमारी गावात ही परंपरा आजही सुरू आहे. मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर सात दिवसांनी या परंपरेला सुरुवात होते. मासिक पाळी आल्यानंतर मुलीला प्रथम कुटुंबापासून दूर ठेवलं जातं, तिच्यावर सूर्यप्रकाश सुद्धा पडू दिला जात नाही. त्यानंतर तीचं केळीच्या झाडाशी लग्न लावण्याची प्रक्रिया सुरू होते. या काळात मुलीला खाण्यासाठी फक्त फळं दिली जातात. वाद्यांच्या तालावर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितित धूमधडाक्यात हा विवाह सोहळा पार पडतो. या लग्नाला स्थानिक भाषेत तुलोनी बिया (Tuloni Biya) असे म्हणतात.
मासिक पाळी आल्यानंतर होणारं हे लग्न मुलीच्या आयुष्यातील पहिलं लग्न मानलं जात. लग्नाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुली नेहमीप्रमाणे आपलं सर्व सामान्य आयुष्य जगतात. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही सोलमारी गावात उत्साहात पाळली जाते. केळीच्या झाडासोबत पहिलं लग्न झाल्यानंतर. मुलगी मोठी झाल्यानंतर मुलासोबत तिता विवाहसोहळा पार पडतो.
(Source – Wikipedia)