Uttarakhand Cloudburst – जीवंतपणी मृत्यू पाहिला अन् डोळ्यादेखत सहकारी वाहून गेले…; जवानाने सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

उत्तराखंडमधील (Uttarakhand Cloudburst) उत्तरकाशीतील धराली येथे दोन दिवसांपूर्वीच ढगफुटीचे संकट कोसळले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यांमुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत ११ जवानांसह ७० जण बेपत्ता झाले असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे. या अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांमधील एक जवान या घटनेतून सुखरुप बचावला. मात्र यावेळी त्याने अनुभवलेला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग त्याने माध्यमांशी बोलताना सांगितला.

उत्तराखंडमध्ये दरवर्षी ढगफुटीच्या घटना घडतात. या प्रसंगातून वाचणं फार कठीण असतं. अशीच परिस्थिती यावर्षी पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वीच धराली येथे ढगफुटी झाली आणि नजरेसमोर सगळ होत्याच नव्हतं झालं. पुराची माहिती मिळताच आम्ही बचावकार्यासाठी निघालो, असे तो जवान म्हणाला. बचावासाठी निघालो खरे पण पुढे काय होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. आम्ही बचावकार्य सुरू केलं आणि अचानक पाण्याच्या प्रवाहासोबत प्रचंड चिखल आला. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे आम्ही त्यात वाहू लागलो. त्यावेळी समोर मृत्यू दिसत होता. तेथील परिस्थिती पाहता क्षणभर वाटलं की आता वाचणार नाही.

या वाढत्या प्रवाहासोबत आम्ही ३० मीटरपर्यंतत्या चिखलासोबत वाहून गेलो. स्वरक्षणाचा काहीच मार्ग नव्हता. तितक्यात माझ्या हाताला एक झाड लागलं आणि तुटलेल्या झाडाच्या आधारानं आम्ही किनाऱ्याला पोहोचलो. आम्हाला खरचं दुसरं आयुष्य मिळालंय. डोळ्यादेखत एक जेसीओ, एक हवलदार आणि ७ अग्निवीर मातीच्या चिखलात दिसेनासे झाले. त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. त्यांची शोधमोहीम सुरुच आहे. बुधवारी ११ जवानांना वाचवण्यात यश आलं. आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे त्या हर्षिल खोऱ्यात वाचलेल्या जवानाने सांगितले.

आम्हाला वाचण्याची आशाच नव्हती. कारण नदीत वाहून गेलो होतो. माझ्यासमोर अनेकजण वाहून गेले. अजूनही त्यांचा शोध लागलेला नाहीय. माझा जीव वाचला आणि मला दुसरं आयुष्य मिळालंय असंच वाटतंय, असं यूपीच्या बलिया इथल्या अग्नीवीर सोनू सिंहने सांगितले. तर हरियाणातील अग्निवीर दीपक म्हणाला आम्ही १२ जण एका जागेवर असताना अचानक मलबा वाहून आला आणि सात लोक कुठे गेले कळलंच नाही. नदीत झाडं, लाकडं वाहून आली नसती तर आम्ही वाचलो नसतो. या थरारक दृष्यामुळे सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत.