मराठ्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्य प्राण्यांचा वासोटा गडाच्या परिसरात वास्तव्य आहे. त्यामुळे वासोटा गडावर जाणं म्हणजे एक प्रकारे साहसाची परीक्षा असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.
ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा करण्यात आला आहे. वासोटा गड सध्या अभयाराण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या गडावर जाण्यापूर्वी वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. कोयना जलाशयाला खेटून असलेला हा गड गिरीदुर्गांना सतत आकर्षीत करत आला आहे. परंतु मुंबई आणि पुणे वरून जाणाऱ्या दुर्गप्रेमींना माहिती अभावी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने या ब्लॉगमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
Vasota Fort Trek आणि इतिहास
वासोटा गडासंदर्भात एक दंतकथा प्रचलित आहे. या दंतकथेमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, ज्या डोंगरावर वासोटा आहे, त्या डोंगरावर वशिष्ठ ऋषींच्या एका शिष्याचे वास्तव्य होते. आपल्या गुरुंच्या प्रेमापोटी त्याने वासोटा गडाला सुरुवातीला ‘वसिष्ठ’ असे नाव दिले होते. जसजस काळ पुढे सरकत गेला तसतस वसिष्टचे वासोटा असे झाले.
गडाची बांधणी पन्हाळ्याच्या शिलाहार राजवटीतील भोजराचा दुसरा (1176-1196) याने बाराव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. मात्र, भोजराजा दुसरा यानेच वासोटा बांधला याचा ठोस पुरावा आढळून येत नाही. कालांतराने वासोटा आदिलशाहीने आपल्या ताब्यात घेतला. आदिलशाहीतर्फे गडाचा कारभार पाहण्याची जबाबदारी शिर्के आणि त्यांच्यानंतर जावळीचे मोरे यांच्या घराण्यांकडे सोपवण्यात आली होती. 16 जून 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा स्वराज्यात दाखल करून घेतला आणि गडाचे नामकरण व्याघ्रगड असे केले.
Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या
पन्हाळ्याला जेव्हा वेढा पडला होता, तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्धी जौहरला मदत केली. कहर म्हणजे इंग्रजांनी सिद्धी जौहरसाठी पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला होता. याचा वचपा काढण्यासाठी जेव्हा राजापूर मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटरी, तेव्हा तिथल्या इंग्रंज अधिकाऱ्यांना कैद केले होते. या इग्रंज अधिकाऱ्यांमध्ये ग्रिफर्ड, फॅरन आणि सॅम्युअल यांचा समावेश होता. शिवरायांनी या अधिकाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवत तीन वर्ष वासोट्यावर कैद केले होते.
ताई तेलिणीने गड लढवला
चिपळून जवळ असणाऱ्या’गोवळकोट उर्फ गोविंदगडाच्या’ मोहिमेत 1733 साली वासोट्यावर काही तोफा पाठवण्यात आल्या होत्या. तसा उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळून येतो. उत्तर पेशवाईच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने पंतप्रतिनिधींना या ठिकाणी कैद केले होते. त्यामुळे पंतप्रतिनिधींची उपपत्नी ताई तेलीण उर्फ रमाबाईने वासोटा जिंकून घेतला घेतला 1807 मध्ये गडावर वास्तव्य केले आणि मोठ्या हुशारीने पंतप्रतिनिधींचा तुरुंगातून मुक्तता केली.
याच दरम्यान दुसऱ्या बाजीरावने 1808 साली वासोटा जिंकून घेण्याची कामगिरी बापू गोखले यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार त्याने वासोट्यावर चढाई केली वासोटा जिंकून घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. वासोटा ताब्यात घेण्यासाठी त्याने जुन्या वासोट्यावर चढाई करत तिथून नव्या वसोट्यावर तोफांचा मारा सुरू केला. ताई तेलिणीने तितक्याच ताकदीने प्रतिकार केला. जवळपास आठ महिने ताई तेलिणीने किल्ला लढविला, पर अखेर तिचा पराभव झाला आणि बापू गोखले गड जिंकून घेण्यात यशस्वी ठरले.
तुरूंग अन् वासोटा
खडकीची लढाई 1817 मध्ये झाली होती. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर खबरदारी घेत सुरक्षेचा उपाय म्हणून दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना वासोट्यावर आणून ठेवले होते. त्यानंतर कॅनेट्स हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना पुण्याकडे जात असताना मराठ्यांनी मराठ्यांचा हिसका दाखवला आणि ताब्यात घेत वासोट्याला आणले. इसवी सन 1818 पर्यंत वासोटा मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर जनरल प्रिझलर या इंग्रज अधिकाऱ्याने जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवल्या आणि 29 मार्च 1818 रोजी वासोटा जिंकून घेतला.
गडावर गेल्यानंतर पहायचे काय
वासोटा गडावर जाणे स्वर्गाहून कमी नाही. गडावर जाताना कोयना जलाशय पडावातून पार करावा लागतो. निसर्गाच विहंगम दृश्य आणि शांत जलाशय पाहून सर्व थकवा नाहीसा होतो. गडावर जाताना पायवाटेने वरती गेल्यानंतर वासोटा एक दरवाजा आणि दरवाजाजवळ हत्तीचे शिल्प आहे. गडाचं प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहे. गडावर मारूतीचे मंदिर, भग्नावशेष, मोठा तलाव, महादेवाची सुंदर मंदिर पाहण्यासारखे आहे.
हे सर्व पाहून झाल्यानंतर बालेकिल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. महादेवाच्या मंदिराच्या इथून एक चिंचोळी वाट बालेकिल्ल्यावर जाते. या माचीला काळकाईचे ठाणे या नावाने उल्लेख केला जातो. माचीवरून आजूबाजूला चौफेर नजर मारल्यानंतर रसाळ, सुमार, चकदेव, महिपतगड आणि कोयनेचा संपूर्ण जलाशय नजरेस पडतो. त्याच बरोबर गडावर चुन्याचा घाना सुद्धा आहे. तसेच इंग्रजी ‘यू’ आकाराचा बाबु कडा पाहण्यासारखा आहे. या कड्यावरून समोरच उंच डोंगर लक्ष वेधून घेतो. हा डोंगर म्हणजे ‘जुना वासोटा’ होय.
जुन्या वासोट्यावर जाण्यासाठी वाट अस्तित्वात नाही. त्याचबरोबर या ठिकाणी घनदाट जंगल आणि पाण्याचा तुटवड आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने जुन्या वासोट्यावर जाण टाळावे.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्याच्या प्रामुख्ये तीन चार वाटा आहेत. प्रामुख्याने सातारामार्गे तीन वाटा गडावर गेल्या आहेत. एक वाट जी सर्वात प्रचलित आहे ती म्हणजे मेट इंदवली. मेट इंदवलीमार्गे गडावर जाण्यासाठी साताऱ्याहून बामणोली या गावात जावे लागेल. सातारा ते बामणोली हे साधारण 30 किमीचे अंतर आहे. सातारा-कास पठार-बामणोलीला जाण्यासाठी साधारण एक तास लागतो. तसेच बामणोलीहून कोयना धरणाचा जलाशय लाँचने पार करून मेट इंदवलीला जायला दीड तास लागतो. साताऱ्यातील खिरकंडी, कुसापूर आणि एक वाट महाबळेश्वर मार्गे वासोट्यावर जाते.
वासोट्यावर जाण्यासाठी कोकणातील चिपळूनहून दोन वाटा गडावर जातात. चिपळून तालुक्यातील चोरवणे या गावातून नागेश्वर पठारामार्गे गडावर जाता येत. तसेच चिपळूणहून तिवरे या गावातून रेडे घाटाने वासोट्याला जाता येत.
गडावर जेवण्याची राहण्याची सोय आहे का
वासोटा हा नागेश्वर ही दोन्ही ठिकाणे कोयना अभयारण्यात आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहण्यास परवानगी नाही. त्याच बरोबर गडावर जेवणाची कोणताही सोय नाही. गडाच्या परिसरात चुल पेटवण्यास किंवा आग लावण्यास सक्त मनाई आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गडावर सोय होऊ शकते.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.