ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. तसेच शिक्षक सुद्धा ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये शिकवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. परंतू अशाही परिस्थितीत महाराष्ट्रात आजही असे काही शिक्षक आहेत, जे ग्रामीण भागांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या परीने होतील त्या शक्य अशक्य अशा सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत आहेत. ग्रामीण असो वा शहरी मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्षात अनुभवाची जोड मिळाली तर, मुलांचा संबंधित विषयासंदर्भातली संकल्पना आणखी स्पष्ट होते. असाच उपक्रम जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उज्वला वाडेकर यांनी राबवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये उज्ज्वला वाडेकर या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणासोबत आयुष्याचे धडे देत आहेत. असाच एक सुंदर उपक्रम त्यांनी राबवला आणि वर्गातील इशा या विद्यार्थीनीच्या वडिलांच्या पंक्चरच्या दुकानात मुलांची शाळा भरली. यावेळी मुलांना पंक्चर कसा ओळखायचा ते पंक्चर कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तसेच त्यासाठी लागणार्या साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. zp_teacher_ujjwala_wadekar या इन्स्टाग्रामव अकाउंटवर उज्ज्वला वाडेकर मॅडमनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram