Virat Kohli Record – सिडनी वनडेमध्ये विराटची बॅट तळपली; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला, संगकारालाही टाकलं मागे

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या तिसर्‍या वनडेमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli Record) बॅट अखेर तळपली. रोहित शर्माच्या सोबतीने त्याने दुसऱ्या विकेटसाठी 186 धावांची विजयी भागीदारी केली. विराटने 74 धावांची नाबाद खेळी केली आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला.

तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 81 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांच्या मदतीने 74 धावांची नाबाद खेळी केली. तर हिटमॅन रोहित शर्माने 125 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 121 धावांनी नाबाद खेळी केली. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या या झुंजार फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 69 चेंडू राखून 9 विकेटने सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे. वनडे आणि टी-20 मध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा बहुमान आता विराट कोहलीने पटकावला आहे. या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या नावावर 18,436 धावा आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर ता 18,443 धावांची नोंद झाली आहे. पुढील काही सामन्यांमध्ये यामध्ये आणखी धावांची भर पडेल.

संगकारालाही टाकलं मागे

विराट कोहलीने वनडेमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावावर 18,426 धावा आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा होता. त्याच्या नावावर 14,234 धावा होत्या. मात्र, आता विराट कोहलीने 14,255 धावा करत कुमार संगकाराला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे अव्वल दोन्ही खेळाडू भारताचे असल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

error: Content is protected !!