Wai News – ‘एक विवाह, एक झाड’; बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक निर्णय, विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक

माझी वसुंधरा 6.0 अभियानांतर्गत वाई तालुक्यातील (Wai News) बावधन ग्रामपंचायतीने विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावाला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. फक्त झाडं लावणे नाही, तर झाडाची काळजी घेणे आणि झाडाचे संगोपन करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे.

गावामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांबरोबर आता विवाह नोंदणी करताना वधू-वरांना पाची देऊळ डोंगर परिसरात एक झाड लावणे व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या या अभिनव आणि पर्यावरणपूरक निर्णयाची सध्या तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. या कौतुकासपद उपक्रमाचा शुभारंभ योगेश वेदपाठक व धनश्री वेदपाठक या दांपत्याने केला. दोघांनी मिळून पाची देऊळ डोंगर परिसरात वडाचे झाड लावले आणि त्याचे संगोपन करण्याचे वचन दिले. विवाह नोंदणी करताना झाड लावून त्याचा जिओ-टॅग फोटो ग्रामपंचायतीत सादर करावा, जेणेकरून “एक विवाह, एक झाड” हा संकल्प खऱ्या अर्थाने साकार होईल, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

वृक्षारोपण झाल्यानंतर सरपंच वंदना कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांनी डिजिटल बारकोड असलेले प्रमाणपत्र देऊन वेदपाठक दांपत्याला गौरविण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ, कॉम्पुटर ऑपरेटर श्रीराम पोतदार, शशिकांत चव्हाण, रोहित सूर्यवंशी उपस्थित होते.