Wai News – महिनाभरापूर्वी बांधलेला पूल वाहून गेला! वाईत ‘कागदावरचं काम’ पावसात उघड!

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच वाई (Wai News) शहरातील फुलेनगर परिसरात किवरा ओढ्यावर उभारण्यात आलेला पर्यायी पूल रविवारी दुपारी पावसाच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. सार्वजनिक निधीतून अवघ्या महिनाभरापूर्वी बांधलेला हा पूल इतक्या लवकर कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानंतर पुलाला तडे जाऊन काही क्षणांतच तो पूर्णपणे पाण्यात वाहून गेला, त्यामुळे स्थानिक वाहतूक विस्कळीत झाली.

या घटनेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून निकृष्ट दर्जाची कामे, अपुरी तांत्रिक देखरेख आणि ठेकेदारांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनेनंतर भाजपचे तेजस जमदाडे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ पंचनामा करून प्रकरण दडपण्याऐवजी संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी व्हावी, असा जोरदार सूर नागरिकांकडून उमटत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!