Wai News पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली की, ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. गावाकडची मुलं अगदी उत्साहात शेतीच्या कामांमध्ये आई-वडिलांना मदत करत असतात. पंरतु शहरी भागातील मुलांना शेतीच्या कामांबद्दल अगदीच तुरळक माहिती असते किंवा काहीच माहिती नसते. त्यामुळे शहरातील मुलांना प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेता येत नाही. पण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालये स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी असा खास उपक्रम आयोजित करतात, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांची नाळ मातीशी हमखास जोडली जाते. याच अनुषंगाने वाई तालुक्यातील पसरणीमध्ये असणाऱ्या ‘ज्ञानदीप इंग्लीश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज’ने पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी खास सहलीचे आयोजन केले होते. आपल्या विद्यार्थ्यांना भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून शेताच्या बांधावर विशेष सहल आयोजित करण्यात आली होती.
वाई पासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वयगांवमध्ये विद्यार्थ्यांची ही विशेष सहल पार पडली. इयत्ता सातवी ‘अ’ आणि ‘ब’ तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सहल आयोजित करण्यात आली होती.
वयगांवमधील प्रगतशील शेतकरी संदीप वाडकर, प्रकाश वाडकर, बाजीराव वाडकर आणि संतोष केळगणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भात लावणीसंदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना भात लावणीची पारंपरिक पद्धत समजावून सांगण्यात आली.
त्यानंतर रोपं कशी निवडावीत, योग्य अंतरावर रोपं कशी लावावीत याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच चिखलात उतरून भात लावण्याचा आनंद घेतला. शाळेच्या या विशेष उपक्रमात शाळेच्या शिक्षिका शीला खाडे, कविता नलावडे, सरस्वती वाशिवले आणि कार्तिकी कासुर्डे यांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सोबतीने शिक्षकांनी सुद्धा भात लावण्याचा अनुभव घेतला. शाळेच्या या विशेष सहलीमुळे ज्या गोष्टी केवळ पुस्तक वाचून समजत नाहीत, त्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता आल्या आहेत.
भात लावणीचा हा अनुभव केवळ एका सहलीपूर्ता मर्यादित नव्हता, तर तो एक शिकवण देणारा श्रमसंस्कारांचा उत्सव होता. या अनोख्या सहलीमध्ये वयगांवच्या सरंपच अश्विनी एकनाथ सुतार, उपसरंपच प्रशांत बाजीराव वाडकर आणि ज्ञानदीप इंग्लीश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांचा विशेष पाठिंबा राहिला.