वाई (Wai News) तालुक्यातील जांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. असद कमरुद्दीन इनामदार या अकरा वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता गळ्याला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून इनामदार कुटुंब हादरून गेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांब गावातील कमरुद्दीन रशीद इनामदार हे पत्नी आणि दोन मुलांसह गावामध्ये वास्तव्याला आहेत. नेहमीप्रमाणे मोठा मुलगा हा शाळेत गेला होता. तर लहान मुलगा असद हा आजारी असल्यामुळे घरीच थांबला होता. घरातील एक रुममध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी तो झोका खेळत होता. तर दुसऱ्या रुममध्ये पाहुणे आल्याने असदची आई त्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होती. मात्र याच दरम्यान खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक असदच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळाने आई असदला पाहण्यासाठी आत गेली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर असदला शेजाऱ्यांच्या मदतीने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केल. या घटनेमुळे जांब गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.