वाई (Wai News) तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. याचा फटका जोर गावाला सुद्धा बसला आहे. शनिवारी (26 जुलै 2025) रात्री कुंभजाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे.
जोर गावामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्यामुळे मुख्य शहराशी जाण्या येण्यात या गावातील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच आता पुन्हा पावसाच्या तडाख्यामुळे कुंभजाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. शनिवारी (26 जुलै 2025) मध्यरात्री पूल वाहून गेला असून सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना याची माहिती झाली. 2021 मध्ये झालेल्या महापूरात या गावातील साकव पूल वाहून गेला होता, तसेच एक मुलगा आणि त्याची आई पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाची तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली होती. परंतु आता पुल वाहून गेला असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.