Wai News श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांचं वंदनगडावर संवर्धनाच काम सुरू आहे. वेळात वेळ काढून सर्व सदस्य गडावर संवर्धनाच काम नियमीतपणे करत आहे. सोमवारी (4 जुलै 2025) सुद्धा गडाचं संवर्धन करण्यासाठी सर्वजण गडावर गेले होते. यावेळी संवर्धन करत असताना मातीच्या ढिगाऱ्यामध्ये नंदी महाराजांची मुर्ती आढळून आली आहे. दोरीच्या सहाय्याने नंदी महाराजांना वरती काढण्यात आलं आहे. नंदी महाराजांची मुर्ती सापडल्यामुळे दुर्ग सेवकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवार सुरू असल्यामुळे महादेवाची पूजा आणि अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात गडावर पार पाडला जातो. मागच्या वेळी संवर्धन करत असताना अभिषेकाचं पाणी जाण्यासाठी मार्ग शोधत असताना पाणी जाण्याची एक प्राचीन वाट आढळून आली होती. त्यानंतर आम्ही तसच पुढे गोमुख असेल या आशेने वाट खोदत नेली. वाट खोदत असताना आम्हाला एक दगड दिसला. सुरुवातीला तो दगड कोणता आहे याची कल्पना आम्हाला नव्हती. परंतु जेव्हा पूर्ण दगड दोरीच्या सहाय्याने बाहेर काढला तेव्हा नंदी महाराजांचं आम्हाला दर्शन झालं. शब्दात सांगता न येणारा आनंद झाल्याच दुर्ग सेवकांनी सांगीतलं. गडावर सापडलेली नंदी महाराजांची मुर्ती भग्नाअवस्थेत असून कोणीतरी तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुर्ती पूर्णपणे तुटली नाही आणि लपवून ठेवण्याच्या उद्देशाने ती कोणीतीरी उलटी ठेवली असावी, अशी शक्यता दुर्ग सेवकांनी बोलून दाखवली.
श्रावणी सोमवार सुरू असल्यामुळे महादेवांच्या पुजेसाठी आता नंदी महाराज सुद्धा असणार त्यामुळे दुर्ग सेवकांचा आनंदाचे वातावरण होते. तसेच पुजा अर्चा करून नंदी महाराजांची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याच सुद्धा यावेळी दुर्ग सेवकांनी सांगितलं आहे.