Wai News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला असून मुंबईच्या वेशीवर सर्व आंदोलनकर्ते पोहचले आहेत. खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लाँग मार्च आता नवी मुंबईमध्ये पोहोचला आहे. सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाई पासून मुंबईपर्यंत येईपर्यंत सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागला, परंतु सरकारने अद्याप याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. आंदोलनकर्त्या महिलांना अक्षरश: अश्रु अनावर झाले असून, या सरकारने आमची दखल घेतली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“आज दोन वर्ष झाली खडी क्रशर बंद व्हावं यासाठी आम्ही झगडत आहोत. आमच्यावर खूप अन्याय केला आहे. आमची कोणीही तक्रार घेत नाही. त्यामुळे आम्ही हा रस्ता धरला. हा शेवटचा लढा आम्ही मंत्रालयापर्यंत घेऊन चाललो आहोत. आमचे पाय सुजले आहेत. कोणाला फोड आले आहेत. आमच्या महिलांना अॅडमीट करावं लागलं. तरीही या सराकरने आमची दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही पायी पायी निघालो आहे.” अशा तीव्र भावना आंदोलनकर्त्या नंदा चंद्रकांत पार्टे यांनी सामाजिक कार्यकर्ते जयवंत निकम यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या.
खडी क्रशर म्हणजे काय?
खडी क्रशर म्हणजे मोठ्या दगडांना (बोल्डर) लहान तुकड्यांमध्ये फोडण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र. हे यंत्र सामान्यतः खाणीजवळ, डोंगराळ भागात किंवा नदीकाठावर लावलेले असते. मोठ्या दगडांपासून खडी तयार केली जाते आणि ती विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरली जाते.