Wai News – घरात घुसून कुत्र्याचा फडशा पाडला! जांभळी खोऱ्यात बिबट्याची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाई (Wai News) तालुक्यातील जांभळी खोऱ्यात बिबट्याचा वावर वाढत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभयारण्याच्या प्रक्रियेमुळे या भागात वन्यप्राण्यांची संख्या वाढली असून बिबटे, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे दर्शन वारंवार होत असल्याचे स्थानिक सांगत आहेत.

रविवारी मध्यरात्री बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरकाव करत जांभळी येथील माजी पोलीस पाटील आनंदा कांबळे यांच्या घरात घुसून त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.

दरम्यान, रानडुकरांकडून शेतीचे नुकसान आणि बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पाळीव जनावरांचे बळी जात असल्याने ग्रामस्थ दुहेरी संकटात सापडले आहेत. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. गस्त वाढवणे, पिंजरे लावणे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे अशा तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. दै. एक्यने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!