Wai News – ढोल्या गणपतीच्या सान्निध्यात 21 मेपासून लघु कुंभमेळा; कृष्णाकाठ भक्तिमय होणार, जाणून घ्या कार्यक्रमाची रुपरेषा

सातारा जिल्ह्यातील ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई (Wai News) नगरीत यंदा पहिल्यांदाच ‘लघु कुंभमेळा २०२६’चे (Laghu Kumbh Mela Wai) आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर २१ ते २५ मे या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात भक्ती आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण होणार आहे. देशभरातील साधू-संत, नागा संन्यासी आणि मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी वाईत दाखल होणार आहेत.

वाई नगरपरिषद, लघु कुंभ सेवा समिती आणि शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, नगराध्यक्ष अनिल सावंत आणि मदन गोसावी महाराज यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. वाई नगरीला प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराला ‘दक्षिण काशी’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. देशातील प्रमुख कुंभमेळ्यांच्या धर्तीवर हा सोहळा आयोजित करून वाईचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा प्रसार करण्याचाही उद्देश आयोजकांनी व्यक्त केला.

२१ ते २५ मे : कार्यक्रमांची रूपरेषा

२१ मे (गुरुवार) – गुरुपुष्यामृत योगात छावणी भूमी पूजन आणि छावणी प्रवेश

२२ मे (शुक्रवार) – धर्मध्वजा आरोहण

२३ मे (शनिवार) – श्री विष्णूयाग व सामूहिक हवन

२४ मे (रविवार) – हिंदू महासभा व दीप प्रज्वलन सोहळा

२५ मे (सोमवार) – नागा संन्यासींचे पवित्र स्नान, रथ शोभायात्रा आणि महिला कलश यात्रा

दररोज सायंकाळी कृष्णामाई आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

साधू-संतांचा मोठा सहभाग

या सोहळ्यात देशभरातील विविध आखाड्यांतील संत-महंत, नागा संन्यासी, हठयोगी यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे भाविकांना विविध परंपरांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

<p

भाविकांसाठी विशेष व्यवस्था

लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. सीसीटीव्ही देखरेख, स्वतंत्र मार्ग, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. साधू-संतांच्या निवासाची व महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण

या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांनाही या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

वाईसाठी ऐतिहासिक संधी

या उपक्रमामुळे वाईच्या धार्मिक ओळखीला नवे बळ मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

error: Content is protected !!