Wai News – घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, पसरणीमध्ये अजित पवार यांचं जनतेला आवाहन

लोकशाहीर पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कला स्मारकाची पाहणी आणि स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाई (Wai News) तालुक्यातील पसरणी येथे पार पडले. यावेळी बोलत असताना घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं.

“अलिकडच्या काळात आपली मराठी भाषा इतकी महत्त्वाची आहे. परंतु बहुतेकांची मुलं, नातवंड, पतवंड इंग्रजी शाळेत टाकली जातायत. ठीके त्यांना जे वाटेल ते करा. परंतु घरात तरी सतत मराठी बोलत चला. महाराष्ट्रात सतत मराठी बोलत चला. नाहीतर पुढं काही वर्षांनी आपल्याला मराठी अशी काही भाषा होती, अशी सांगण्याची वेळी दहा वीस पिढ्यांच्यानंतर येऊ नये याकरता आपण आपल्या भाषेचा, मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे.” अस म्हणत घरात आणि महाराष्ट्रात मराठीतच बोललं पाहिजे असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

समोरचा हिंदीत बोलला तरी आपण मराठीतच बोलायचं

“कोणी तरी हिंदी बोलायला लागला की आपण लगेच त्याच्याशी हिंदी बोलतो. आपण त्याच्याशी मराठीत बोलायचं, तो झक मारत मराठी बोलतो. हे आपण लक्षामध्ये ठेवा. उगीच काहीजण फार आव आणायचा प्रयत्न करतात. आणि इंग्लीश वाला तर काही विचारायची सोय नाही.” असा टोलाही अजित पवार यांनी लगावला

मराठी मातृभाषा उत्तमपणे वाचता, बोलता, लिहिता आली पाहिजे

“जगामध्ये फिरण्याकरीता इंग्रजी भाषा आली पाहिजे. हिंदी भारता करता अनेक राज्यांमध्ये चालणारी भाषा आहे, ती पण आली पाहिजे. परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता, लिहिता, वाचता आली पाहिजे. ती एकदा लिहिता, वाचता, बोलता आली तर हिंदी वाचायला बोलायला काही अडचण येत नाही.” असे अजित पवार म्हणाले.

 

याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राधाबाई साबळे, यशोमती शिंदे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजाराम निकम, संजय साबळे, महंत सुंदरगिरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.