Wai News – वाईत अल्पवयीन मुलांकडून दुचाकीची धोकादायक वाहतूक, अपघाताचा धोका वाढला; कारवाईची मागणी

गजबजलेल्या आणि ऐतिहासिक वाई (Wai News) शहराला भेट देण्यासाठी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीला जाण्यासाठी वाईतूनत जावं लागतं. त्यामुळे बऱ्याच वेळा वाई स्टँड आणि किसनवीर कॉलेजपर्यंतच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. शनिवारी, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. तसेच सामान्य दिवसांमध्येही वाई शहरामध्ये वाहनांची कायम वर्दळ असते. अशा परिस्थितीत मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांकडून दुचाकीची धोकादायक वाहतूक सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. परवाना नसताना बेभान होऊन दुचाकी पळवली जात आहेत, वाहतूक नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून अशा अल्पवयीनांवर आणि तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

बाजारपेठ परिसर, मोठा पूल, छोटा पूल, वाई स्टँड, किसनवीर कॉलेज रोड परिसरात धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवणाऱ्यांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करत विना हॅल्मॅट, ट्रिपल-सीट, आडवे-तिडवे कट मारत दुचाकी पळवली जात आहेत. त्यामुळे वाईतील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. एकीकडे मुलं बेभान होऊन कोणालाही न घाबरता दुचाकी पळवत आहे, दुसरीकडे पोलीस प्रशासनकाडून कारवाई केली जात नाहीये. पोलीस प्रशासनाची भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. वाई पोलीस प्रशासनाने अशा तरुणांवर तात्काळ कारवाई करून त्यांची वाहने जप्त करावी आणि पालकांवरही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

error: Content is protected !!