प्रवास करत असताना अनावधानाने बऱ्याच वेळा आपल्या मौल्यवान वस्तू या गाडीमध्येच राहतात. अशा परिस्थितीत आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. परंतू संबंधीत गाडीचे चालक आणि वाहक जर प्रामाणिक असतील, तर वस्तू कितीही मौल्यवान असो ती हरवण्याचा धोका अजिबात राहत नाही. याचाच प्रत्यय पारगाव-खंडाळा येथील भोसले कुटुंबाला आला आहे. एसटी बसमध्ये दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स ते विसरून गेले. पंरतू चालक अमर मोमीन आणि वाहक अक्षय कांबळे यांनी प्रामाणिकपणे पर्ससह सर्व वस्तू भोसले कुटुंबाला परत केल्या.
बाबा मांढरे या फेसबुक अकाउंटवर वाई आगारातील चालक आणि वाहकाच्या प्रामाणिकपणाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाबा मांढरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, परेल (मुंबई) ते वाई या एसटीबसमध्ये भोसले कुटुंबाचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स राहिली होती. जेव्हा बस वाई आगारामध्ये पोहोचली, तेव्हा तपासणी दरम्यान सदर पर्स चालक अमर मोमीन आणि वाहक अक्षय कांबळे यांच्या निदर्शनास आली. दोघांनीही तात्काळ चौकशी करून पर्सच्या मालकांचा शोध सुरू केला आणि सदर पर्स पारगाव-खंडाळा येथील भोसले कुटुंबाची असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधत त्यांनी भोसले कुटुंबाला पर्स सुखरुप परत केली.
प्रामाणिकपणा, सेवा आणि जबाबदारी यांची अशी सुंदर जोड पाहून एसटीवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो. अशा चालक-वाहकांच्या कामामुळे एसटीची प्रतिमा अधिक उजळते आणि प्रवास सुरक्षित असल्याचा दिलासा मिळतो, असं बाबा मांढरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.