वाई तालुक्यातील वयगांवमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमाणाचा सण साजरा करण्यात आला. शनिवारी (9 ऑगस्ट 2025) देशभरात बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाचा उत्साह होता. एकीकडे बहिणी भावांना राखी बांधत होत्या तर, दुसरीकडे वयगांवमध्ये मात्र झाडांना राखी बांधून हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून गावातील सर्वच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने झाडांना राखी बांधण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. ‘झाडे आपले जिवलग सोबती’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी यांनी मिळून झाडांना राखी बांधण्याचा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमात गावातील महिलांनी रंगीबेरंगी राख्या जुन्या आणि नव्या झाडांना बांधल्या. झाडांना राखी बांधत असताना “आम्ही तुझं रक्षण करू” असा संकल्प केला. महिला मंडळाच्या सदस्यांनी झाडांच्या मुळाशी पाणी घातले, खत टाकले आणि त्यांची काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी यांचीही साथ लाभली. या अनोख्या उपक्रमामुळे वयगांवमध्ये रक्षाबंधनाचा सण फक्त नात्यांचा नव्हे तर निसर्गप्रेमाचाही सण ठरला. ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘वाई स्वच्छता चषक 2025’ या स्पर्धात्मक सहभागाच्या पार्श्वभुमीवर सर्व वयगांवकरांनी मिळून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=ggfPPzvFPh8