वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप संबंधित प्रभागाचे नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड पारदर्शक प्रक्रियेविना करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नगरसेवक चव्हाण यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिद्धनाथवाडी प्रभागातील ही शाळा त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असूनही मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता समिती गठीत केली. तसेच पालक सभा न घेता आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.
शासनाच्या नियमांनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विद्यार्थ्याच्या पालकाची नियुक्ती करणे बंधनकारक असताना, या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समितीची रचना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा उद्देश असतानाही एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, वाई पालिका प्रशासनाचा शिक्षण विभागावर अपेक्षित वचक नसल्याचे चित्र समोर येत आहे. नगरसेवकांनी शिक्षण मंडळ व नगराध्यक्षांना पत्र दिल्यानंतरही मुख्याध्यापकांनी त्याची दखल घेतली नाही, यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही शिक्षक प्रशासनाला विश्वासात घेत नसल्याचीही चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित समिती तात्काळ बरखास्त करावी, मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि नियमानुसार नव्याने समिती गठीत करावी, अशी मागणी नगरसेवक चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत दैनिक प्रभातनेही वृत्त प्रकाशित करत या विषयाकडे लक्ष वेधले आहे.