Wai News
सामूहिक अत्याचारासारख्या भयंकर गुन्ह्यात जर पोलिसच आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर, न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शरमेने मान खाली जावी असा प्रकार वाई पोलीस ठाण्यात घडला आहे. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणारा नाही. पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावी लागतील, अशी मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण आणि पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिण यांना पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई पोलीस ठाण्यात 3 जुलै रोजी सामूहिक अत्याचाराची तक्रार देण्यासाठी एक महिला आली होती. परंतु पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली नाही. तिच्याकडून फक्त माहिती घेतली आणि त्या महिलेकडून काही जणांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर बिपीन चव्हाण व उमेश गहिण यांनी महिलेने दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून संशयितांना भेटण्यास बोलावले. भेटालया आल्यानंतर बिपीन चव्हान व उमेश गहिण यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करू नये असं वाटत असेल तर, त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. परंतु त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. कारण एका तक्रारदाराने याची सर्व माहिती सातारा लाचलुचपत प्रतिबिंधक विभागाला कळवली आणि पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदार यांच्याबाबत तक्रार केली. लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबिंधक विभागाकाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (4 जूलै 2025) वाई पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये चव्हाण आणि गहिण यांनी 15 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. पंचासमक्ष 20 हजारांची लाच मागीतली होती. परंतु तडजोड करून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे वाई पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी केली आहे.