Wai Premier League – पावसाचा व्यत्यय आणि नाणेफेकीचा कौल, ‘खोडियार माता 11’ संघ ठरला मंत्री चषकाचा मानकरी

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (आबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत वाई तालुक्यातील सर्वात मोठ्या वाई प्रीमियर लीगचे (Wai Premier League) आयोजन करण्यात आले होते. वाईतील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर 16 संघांमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी तुंबळ लढाई पाहायला मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी पावसाने हिरमोड केल्याने नाणेफेकीच्या मदतीने मंत्री चषकाचा मानकरी ठरवण्यात आला आणि बाजी मारली ती खानापूरच्या खोडियार माता 11 या संघाने.

निलेश भोसले आणि राजीव शिर्के यांच्या माध्यमातून मंत्री मकरंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षी मंत्री चषकाचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष असून या स्पर्धेसाठी एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावण्यासाठी गेली 5 दिवस द्रविड हायस्कुल मैदानावर अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. धुवांधार फटकेबाजी पाहून चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. रविवारी (26 ऑक्टोबर 2025) अंतिम सामन्यापूर्वी मंत्री मकरंद पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी लावत खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Makarand Patil – अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान; यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही – मंत्री मकरंद पाटील

पहिली सेमी फायनल रंगली ती शिवतेज बॉईजविरुद्ध उपसरपंच 11 भुईंज या संघांमध्ये. या सामन्यात शिवतेज बॉईज संघाने उपसरपंच 11 संघाचा 28 धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. तर दुसऱ्या सेमीफायलनध्ये खोडियार माता 11 संघाने चवणेश्वर 11 संघाचा 9 विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. उभय संघांमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी एक जबरदस्त लढाई होणार, अशी चाहत्यांसह सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पावसाने आपली बॅटिंग सुरू केल्याने सामना होऊ शकला नाही. अखेर नाणेफेकीच्या आधारे विजेता संघ निवडण्यात आला. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला नितीश चव्हाण आणि संदीप चव्हाण यांच्या मालकीचा खोडियार माता 11 हा संघ.