Wai Vishesh – धोम धरणात लवकरच ‘सी प्लेन’ सेवा सुरू होणार! स्थानिकांना कसा होणार फायदा? वाचा…

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई (Wai Vishesh) तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धोम धरणात “सी प्लेन” सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. केंद्र सरकारच्या “उडान 5.5” या योजनेअंतर्गत ही “सी प्लेन” सेवा सुरू होणार आहे.

वाई तालुक्याला चहुबाजूंनी डोंगरागांनी वेढलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी वाईला आवर्जून भेट देतात. अनेक प्रसिद्ध चित्रपटांच चित्रीकरण वाईमध्ये झालं आहे. त्याचबरोबर पाचगणी, महाबळेश्वर आणि प्रतापगडला जाणारे पर्यटक सुद्धा वाईमध्ये हक्काचा थांबा घेऊनच पुढचा प्रवास करत असतात. वाईमध्ये थांबल्यानंतर वाईतील प्रसिद्ध ढोल्या गणपती, मेनवली घाट आदी पर्यटन स्थळांसह वाई पासून जवळच असलेल्या धोम धरणात बोटींगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. संथ वाहणार्‍या कृष्णामाईच्या जलाशयात बोटींगचा आनंद घेण्यासाठी लांब लांबून पर्यटक येत असतात. त्याचबरोबर हॉर्स रायडिंग आणि उंटावर बसून जलशायच्या बाजून फेरफटका मारण्याचा पर्याय सुद्धा पर्यटकांना असतो. आता यामध्ये सी प्लेनची भर पडणार आहे.

स्थानिकांना कसा होणार फायदा?

सी-प्लेन हे जलवाहतुकीचे एक आकर्षक व आधुनिक साधन असून, याचा स्थानिक पर्यटनाला मोठा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुका, कोयना धरण परिसर किंवा गोवा, केरळसारख्या जलाशय समृद्ध भागात सी-प्लेनचा वापर केल्यास, दुर्गम भागातील पर्यटन स्थळे सहजपणे उपलब्ध होतील. वाई तालुका आणि आसपासच्या परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कांदाटी-सोळशी खोरं, वासोटा, प्रतापगड किल्ला, कास पठार, कोयना धरण, वेण्णा लेक (महाबळेश्वर) यासह अनेक पर्यटन स्थळं आहेत, जी पाहण्यासारखी आहेत. त्याचबरोबर घनदाट जंगल, वनसंपदा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अनेक दुर्गम ठिकाणं आहेत, जी आजही दुर्लक्षित आहेत. या पर्यटन स्थळांना चालना मिळेल आणि यामुळे स्थानिकांनाही फायदा होईल. कारण या परिसरातील सर्व माहिती स्थानिक व्यक्तीच पर्यटकांना चागल्या पद्धतीने सांगू शकतो. 

यामुळे स्थानिक लोकांना नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जलपर्यटन, होम-स्टे, स्थानिक खाद्यपदार्थांची विक्री, मार्गदर्शक सेवा अशा क्षेत्रांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकतो. शिवाय, स्थानिक कलाकुसरी, हस्तकलेचे उत्पादने यांना बाजारपेठ मिळेल. सी-प्लेनद्वारे प्रवास करताना पर्यटकांचा वेळ वाचतो, त्यामुळे अधिक पर्यटक लवकर वेळेत अधिक स्थळांना भेट देऊ शकतात. हे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल.

एकंदरीत, सी-प्लेन हे पर्यटनवाढीसोबतच स्थानिक विकास, सांस्कृतिक जतन आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींना हातभार लावणारे प्रभावी साधन ठरू शकते.