मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह भारतात चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणि भारताच्या आर्थिक राजधानीत मराठ्यांचा मुक्त संचार साऱ्या देशाने पाहिला. हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकं मुंबईत दाखल झाले होते. अखेर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) आणि सातारा गॅझेट (Satara Gazette) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महिनाभारत पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदीसाठी सातारा गॅझेटचा जीआर काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी गॅझिटियर म्हणजे काय? सातारा गॅझेट म्हणजे काय? सातारा गॅझिटियर लागू झाल्या कोणाला फायदा होणार? कोणते जिल्ह्यांना याचा फायदा होणार? हे जाणून घेऊया.
गॅझेट म्हणजे काय? What Is Gazetteer
गॅझेट म्हणजे शासनाकडून प्रकाशित केलेला एखाद्या जिल्हा किंवा प्रदेशाचा अधिकृत माहितीकोश होय. यात भूगोल, इतिहास, लोकसंख्या, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, प्रथा-परंपरा आदी सर्वांचा तपशील असतो. हा ग्रंथ संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांसाठी प्राथमिक व विश्वासार्ह संदर्भग्रंथ मानला जातो.
सातारा गॅझेट काय आहे? What Is Satara Gazetteer
सातारा गॅझेट ब्रिटिश काळात म्हणजेच साधारण 1820 ते 30 च्या सुमारास प्रकाशित झालेला एक सरकारी दस्तऐवज आहे. यामध्ये सातारा प्रांतातील शेती, जमीन, जाती, गावनिहाय वंशावळी, महसूल, कुळाच्या नोंदी, जात या सगळ्यांची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्यांची नोंद ज्या कागदपत्रात करण्यात आली आहे, त्याला सातारा गॅझेट असं म्हटलं जातं.
सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1819 साली जात निहाय जनगणना राबवली होती. या जनगणनेत ज्यांचा व्यवसाय शेती आहे परंतु ते मराठा समाजातील आहेत, त्यांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी कुणबींचा उल्लेख मराठा म्हणून केल्याचा उल्लेख सुद्धा आढळून येतो. 1885 च्या शासकिय गॅझेटमध्ये 1881 च्या जनगणनेत 5 लाख 83 हजार 569 कुणबी नोंद आहे. परंतु 1931 साली अपडेटेट कुणबी नोंदी या 5,789 इतक्या कमी झाल्या आणि कुणबी नोंद असलेल्यांचा समावेश मराठा म्हणून करण्यात आला.
सातारा गॅझेट लागू झाल्या कोणाला फायदा होणार? Banefits Of Satara Gazetteer
सातारा गॅझेटच सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मराठा समाजाचा पायाभूत व्यवसाय शेती असल्याचे या सरकारी नोंदीतून दिसून येतं. कारण, या गॅझेटमध्ये जात नोंदी आणि वंशावळ नोंदी करण्यात आलेल्या आहेत. आणि या नोंदींमध्ये कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी या नोंदी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण आहे. त्यामुळे जर कुणबी आणि मराठा समाज एकच असल्याचं सिद्ध झालं, तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. प्रामुख्याने यामुळे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांना याचा फायदा होईल. मात्र, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला याचा फायदा होणार नाही. कारण सातारा गॅझेट यांना लागू होत नाही.