भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाइपरायटरवर (Dr. Babasaheb Ambedkar Typewriter) संविधान लिहिले तो टाइपरायटर बघण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले, तेव्हा ते दिल्लीला रहायला होते. त्या काळात लॅपटॉप सारखी आधुनिक यंत्रणा नव्हती. त्यामुळे टाइपराटरवरच सगळा मजकूर लिहिला जायचा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा टाइपरायटरवरच संविधान लिहिले. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस बाबासाहेबांनी टाइपरायटरसोबत घालवले आहेत. टाइपरायटर हा निर्जीव असला तरी, बाबासाहेबांच्या सहवासाची आठवण देणारा आहे. हा टाइपरायटर तुम्हालाही पाहता येईल, पण कुठे?
नागपुरमधील चिचोली येथे शांतिवनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वस्तू संग्रहालय आहे. या वस्तू संग्रहालयात हा टाइपरायटर जपून ठेवण्यात आला आहे. या वस्तू संग्रहालयात बाबासाहेबांचे दोन टाइपरायटर आपल्याला पाहता येतात. एका टाइपरायटरवर बाबासाहेबांनी संविधान लिहिले. तर दुसर्या टाइपरायटरवर ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ त्यांनी टाइप केला होता. टाइपरायटर व्यतिरिक्त या वस्तू संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतर अनेक वस्तू आहेत.
जसे की, त्यांचे कोट, खुर्ची, पेन, कप, बूट, टोपी, मोजे अशा अनेक वस्तू या वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. 1911 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे खासगी सचिन नानकचंदजी रत्तू यांनी बाबासाहेबांचे हे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केले होते.
आज नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे वस्तू संग्रहालय शांतिवनात उभे आहे. या शांतिवनाची जागा वामनराव गोडबोले यांना दानात मिळाली होती. त्यामुळे कधी नागपूरला गेलात तर शांतिवनामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहायलाला आवर्जून भेट द्या.

