>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<
सातारा जिल्हा म्हटलं की निसर्गाची मुक्त उधळणं आणि रांगड्या सह्याद्रीचा सहवास. याच सह्याद्रीच्या कुशीत पाचगणी, महाबळेश्वर आणि वाईसह आजूबाजूच्या परिसरात लाच चुटूक स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने लाल स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आला आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर भागात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. परंतू गेल्या काही वर्षांपासून वाईसह आजूबाजूच्या भागांमध्येही स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याचबरोबर पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत विविध प्रयोग सुद्धा केले जात आहे. अशाच एका यशस्वी प्रयोगाची यशोगाथा आपण या विशेष लेखामध्ये घेणार आहोत.
वाई तालुक्यातील शेतकरी उमेश खामकर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत आपल्या शेतात Florida Pearl या पांढऱ्या रंगाच्या (White Strawberry ) स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. भारतात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्याचा हा पहिलाच प्रयोग मानला जात असून या फळाला तब्बल १००० रुपये प्रति किलो इतका विक्रमी दर मिळत आहे. स्ट्रॉबेरी म्हटली की डोळ्यासमोर लाल रंगाचे फळ येते; मात्र ही पांढरी स्ट्रॉबेरी दिसायला आकर्षक, चवीला गोड आणि बाजारात प्रीमियम दर्जाची मानली जाते.
पांढरी ‘Florida Pearl’ म्हणजे काय?
Florida Pearl ही अमेरिकन उत्पत्तीची स्ट्रॉबेरी जात आहे. बाहेरून पांढऱ्या रंगाची आणि वर लालसर बियांनी सजलेली ही स्ट्रॉबेरी दिसायला वेगळी असल्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. तिची चव साधारण स्ट्रॉबेरीपेक्षा थोडी वेगळी असून किंचित अननसासारखा (Pineapple) सुगंध असल्याचे सांगितले जाते. आपली रेग्युलर लाल स्ट्रॉबेरी आणि ही नवीन पांढरी स्ट्रॉबेरी यामध्ये नेमका फरक काय आहे?
रेग्युलर स्ट्रॉबेरी आणि पांढरी स्ट्रॉबेरी यांचा तुलनात्मक फरक
१) रंग व आकर्षकता
-
रेग्युलर स्ट्रॉबेरी: लाल रंगाचीअसून भारताचा विचार करता सर्वांच्या परिचयाची आहे.
-
पांढरी स्ट्रॉबेरी: पांढऱ्या रंगामुळे बाजारात वेगळी ओळख निर्माण करते.
२) चव व गोडी
-
रेग्युलर: किंचित आंबट-गोड चव.
-
पांढरी: कमी अम्लता, जास्त गोडसर चव.
३) बाजारभाव
-
रेग्युलर: हंगामानुसार साधारण २०० ते ४०० रुपये किलो.
-
पांढरी (Florida Pearl): सध्या सुमारे १००० रुपये किलोपर्यंत दर.
४) उत्पादन व जोखीम
-
रेग्युलर: लागवडीचे तंत्र सर्वपरिचित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे बाजार स्थिर.
-
पांढरी: नवीन प्रयोग असल्यामुळे अधिक काळजी व तांत्रिक व्यवस्थापन आवश्यक आहे. अन्यथा भारतीय हवमानाचा तगडा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
रेग्युलर स्ट्रॉबेरी आणि पांढरी स्ट्रॉबेरीचे फायदे व तोटे
रेग्युलर स्ट्रॉबेरीचे फायदे
- उत्पादन तंत्र माहितीपूर्ण व अनुभवाधारित
- विक्रीसाठी तयार बाजारपेठ
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोखीम कमी
तोटे
- महाबळेश्वरसह पुणे आणि नाशिकमध्येही उत्पादन घेतले जात असल्यामुळे बाजारात स्पर्धा जास्त
- बाजारात स्पर्धा जास्त असल्यामुळे दरात मोठी वाढ क्वचितच
पांढरी स्ट्रॉबेरीचे फायदे
- प्रीमियम उत्पादन असल्यामुळे रेग्युलर स्ट्रॉबेरीपेक्षा उच्च दर
- रेग्युलर स्ट्रॉबेरीपेक्षा वेगळी असल्यामुळे ग्राहकांमध्ये आकर्षण
- या स्ट्रॉबेरीला परदेशात मोठी मागणी असल्यामुळे निर्यातीची संधी
तोटे
- लागवडीसाठी विशेष काळजी
- शेतकऱ्यांसह भारतीय ग्राहकांच्या ही स्ट्रॉबेरी अजून तितकी परिचयाची नाही त्यामुळे बाजार अजून मर्यादित
- ग्राहकांना या स्ट्रॉबेरीबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मागणी स्थिर नसल्यास जोखीम वाढण्याची शक्यता
जागतिक मागणी आणि निर्यातीची संधी
पांढऱ्या स्ट्रॉबेरीची सर्वाधिक मागणी जपान, अमेरिका आणि युरोपातील काही देशांमध्ये आहे. विशेषतः जपानमध्ये ‘व्हाईट स्ट्रॉबेरी’ ही लक्झरी फळ म्हणून ओळखली जाते आणि भेटवस्तू म्हणूनही दिली जाते. उच्च उत्पन्न गटातील ग्राहक, पंचतारांकित हॉटेल्स आणि बेकरी उद्योगात या फळाची मागणी वाढत आहे.
शेतकऱ्यांसानी या नव्या प्रयोगातून काय शिकलं पाहिजे?
उमेश खामकर यांचा प्रयोग हे दाखवून देतो की पारंपरिक शेतीसोबत नवीन वाण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास शेतकरी अधिक नफा मिळवू शकतो. मात्र कोणताही नवीन प्रयोग करण्यापूर्वी हवामान, माती, गुंतवणूक आणि विक्रीची खात्री यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. एकूणच, पांढरी Florida Pearl स्ट्रॉबेरी ही शेतकऱ्यांसाठी नफ्याची नवी संधी ठरू शकते; परंतु योग्य नियोजन आणि बाजारपेठेची खात्री याशिवाय हा प्रयोग करणे धोकादायक ठरू शकते.
(सदर बातमीतील प्राथमिक माहिती लोकमत Agro वर आधारित असून इतर माहिती स्वतंत्र संशोधनातून संकलित करण्यात आली आहे.)