Bacchu Kadu – दिव्यांग बांधवांचा आधारवड! पराभवाचा धक्का बसलेला एक तगडा नेता, बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणात एन्ट्री

Maharashtra Assembly Election 2024 चे निकाल जाहीर झाले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजना या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरली आणि याचा फटका महाविकास आघाडीला बसला. राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी ही निवडणूक राजकारणात मुरलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना अक्षरश: घाम फोडणारी ठरली. काही उमेदवार काठावर पास झाले तर काहींची दांडी गूल झाली. सलग तीन ते चार वेळा आमदारकी भुषवलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकुर, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख Bacchu Kadu यांना मतदारांनी चांगलाच धप्पा दिला. मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या निवडणूकीत काठावर म्हणजे फक्त 208 मतांनी निवडून आले.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात 2004 पासून सलग चार वेळा बच्चू कडू आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विजयी एक्सप्रेसला भाजपच्या प्रवीण तायडे यांनी ब्रेक लावला. दिव्यांग बांधावांचा आधारवड, गोरगरिबांचा कैवारी अशी ओळख असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू. त्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव दिव्यांग बांधवांच्या जिव्हारी लागला आहे.

बच्चू कडू यांचे प्रारंभिक जीवन

गरिबांचा ‘रॉबिनहूड’ अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांचा जन्म 5 जुलै 1970 रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा या गावात झाला. ओमप्रकाश बाबूराव कडू हे बच्चू कडू यांचे मुळ नाव होय. जन्मताच समाजसेवेचा विडा त्यांनी उचलला होता. लहानपणापासूनच ते समाजकार्यात सक्रीय होते. जमेल त्या पद्धतीने ते गरजवंतांना मदत करत असे. इयत्ता आठवीला असताना त्यांनी तमाशावर बंदी आणण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्या काळात त्यांच्या या धाडसी वृत्तीच जोरदार कौतुक झालं होतं. त्यांचे शालेय शिक्षण अमरावतीमध्ये पूर्ण झाले. बच्चू कडू यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयीन जीवनात असताना अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव अन् राजकारणात एन्ट्री

महाविद्यालयीन जीवनात असताना बच्चू कडू यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा प्रचंड प्रभाव पडला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे धारधार भाषण आणि मुद्यांना धरून समस्या मांडण्याची कला बच्चू कडूंना प्रभावित करून गेली. बाळासाहेब ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रात होता. या चाहत्यांमध्ये बच्चू कडू यांचा सुद्धा समावेश होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकीय जीवनाचा श्री गणेशा केला.

बाळासाहेबांमुळे प्रभावित झालेल्या बच्चू कडूंनी शिवसेनेत येताच आपल्या कामाचा धडाका सुरू केला. कालांतराने ते शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापतीही झाले. सभापती असताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत ते मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला. अनेक घोटाळे उघड केले. बच्चू कडू सभापती असताना शौचालय घोटाळा चांगलाच गाजला होता. बच्चू कडूंनी हा घोटाळा उघड केला त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. सभापती असताना त्यांनी अपंगांसाठी छोटी मोठी काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, याच मुद्द्यावरून शिवसेना नेत्यांचा आणि त्यांचा वाद झाला. अपंगांना सायकल वाटप करण्यासठी बच्चू कडूंना निधीची आवश्यकता होती. मात्र, शिवसेनेच्या काही नेत्यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट शिवसेनेला अखेरचा रामराम ठोकला.

अपक्ष ते राज्यमंत्री

बच्चू कडू यांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी अनेक छोटी मोठी काम हाती घेत समाजाच्या शक्य होतील त्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजात त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण झाली होती. लहानांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांच्या ह्रदयात स्थान निर्माण करण्यात बच्चू कडू यशस्वी झाले. आपलं काम फक्त तालुका किंवा जिल्हा स्तरापर्यंत मर्यादीत न ठेवता त्याला राज्य स्तरावर कसं घेऊन जाता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. राजकारणात पुढचं पाऊल टाकत 1999 साली बच्चू कडूंनी पहिला डाव टाकला.

महाराष्ट्रात 1999 साली विधानसभा निवडणूक पार पडली. अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू कडूंनी आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांच्या या कठीण काळात त्यांना पत्नी आणि मित्रांनी मोलाची आर्थिक मदत केली. अनेक मित्रांना घरातील दागिने मोडून पैसा उभा केला तर पत्नीने मंगळसूत्र गहाण ठेवले आणि पतीला खंबीर साथ दिली. बच्चू कडूंची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी जोरदार प्रचार केला, सभा घेतल्या, गावागावात जाऊन बैठका घेतल्या. मात्र, त्यांना अपयश आले. अवघ्या 1300 मतांनी त्यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार आणि पहिलीच निवडणूक पाहता बच्चू कडूंनी विद्यमान आमदाराला अक्षरश: घाम फोडला.

पराभवातून शिकले अन् आमदार झाले

बच्चू कडूंनी पराभव स्वीकारला आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली. पुढची पाच वर्ष त्यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार काम केले. सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेत विद्यमान आमदाराला अनेक वेळा त्यांनी कोंडीत पकडले. त्यामुळे अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडूंच्या नावाची चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. याच गोष्टीचा फायदा त्यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीत झाला. त्यांनी पुन्हा एकदा 2004 साली अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा आले. त्यानंतर बच्चू कडू विक्रमी सलग चार वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

दरम्यान, 1999 साली बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कांसाठी लढणे हा होता. विशेष करून दिव्यांग बांधवांसाठी ही संघटना आक्रमक होती. अनेक वेळा अधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपला हिसका सुद्धा दाखवला. त्यामुळे अमरावतीमध्ये संघटनेचा चांगला दबदबा निर्माण झाला होता. दिव्यांग बांधवांसाठी आवाज उठवणारी संघटना अशी एक वेगळी ओळख या संघटनेची निर्माण झाली होती.

आमदारांच्या पगार वाढीला विरोध करणारे बच्चू कडू हे एकमेव आमदार होते. पगार वाढीला विरोध केल्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. 2017 साली शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र ते गुजरात असी भव्य मोटारसायकल रॅली त्यांनी काढली होती. CM टू PM अस या रॅलीला नाव देण्यात आलं होतं. या रॅलीचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावात होणार होता. मात्र, त्यांचा ताफा अर्ध्या वाटेतच अडवण्यात आला. त्यामुळे रॅली पूर्ण होऊ शकली नाही.

सामाजिक भान जपणारा नेता

बच्चू कडू आमदार झाले असले तरी त्यांची गावच्या मातीशी असणारी नाळ कधी तुटली नाही. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमदार असूनही त्यांनी कधी त्याचा बडेजाव केला नाही. समाजकार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होते. विक्रमी रक्तदान करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शंभराहून अधिक वेळा रक्तदान करणारे बच्चू कडू एकमेव आमदार आहेत. रक्तदान करण्याचा जणू सपाटाच त्यांनी लावला होता. रक्तदान करून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामध्य्ये त्यांच्या मित्राचा सुद्धा समावेश आहे.

रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी जवळपास 20 ते 25 हजार बाटल्या रक्त राज्यातील विविध रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये पुरवले आहे. बच्चू कडूंनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले त्यांना नवसंजीवनी मिळाली. बच्चू कडू यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महात्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर लग्न केले. तसेच लग्नाच्या खर्चातून त्यांनी 250 अपंगांना 3 चाकी सायकल व कृत्रिम अवयवांचे वाटप केले. हा सर्व कार्यक्रम लग्न समारंभात पार पडला. बच्चू कडू यांनी वेगळा आदर्श समाजात निर्माण केला. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.

कामचुकार अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले

सामाजीक जाण असणारा नेता ही बच्चू कडू यांची एक ओळख. बच्चू कडू यांची दुसरी ओळख म्हणजे हटके आंदोलन करून न्याय मिळवून देणारा नेता. बच्चू कडू यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक आंदोलन केली. गरज पडल्यास अधिकाऱ्यांचे गाल लाल करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यालयात फटाके फोडले, साप सोडले, त्यांच्या तोंडाला काळ फासलं, चपलांचा हार घातला अशी अनेक आंदोलन त्यांनी केली. त्यांच सर्वात गाजलेलं आंदोलन म्हणजे दिल्ली येथे अपंग बांधवांचा मोर्चा. या मोर्चामध्ये जवळपास 25 हजार दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता. बच्चू कडू स्वत: त्यांना घेऊन दिल्लीमध्ये गेले होते. तब्बल 21 दिवस दिल्लीमध्ये त्यांचे उपोषण सुरू होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही हा पक्का निर्धार त्यांनी केला होता. शेवटी केंद्र सरकारला बच्चू कडूंच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एकाच दिवसात केंद्राने 11 शासन निर्णय पारित केले.

राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बच्चू कडू चौथ्यांदा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र ही निवडणूक राज्याच्या राजकारणातली फोडाफोडीची निवडणूक ठरली. महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे बच्चू कडू यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले. विशेष बाब म्हणजे रक्तदान करून बच्चू कडू यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.

कार्यक्षम आमदार म्हणून सत्कार

बच्चू कडू यांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राने पाहीला. वेळोवेळी त्यांनी विधान परिषदेत आवाजही उठवला. त्यांचा कामाच धडाका पाहून त्यांना दिवंगत विधान परिषद सदस्य माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला ‘कार्यक्षम आमदार’ या पुरस्काराने गोरवण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना 50 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुद्धा बच्चू कडू यांनी सामाजिक भान जपत बक्षीस स्वरुपात मिळालेली सर्व रक्कम विधवा आणि दिव्यांगांसाठी दान केली. 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment