गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी केली होती. त्यामुळे या गडाचे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दौलतमंगळ आणि इतिहास
दौलंतमंगळ या गडाचं नाव शहाजी महाराजांच्या नावाशी जोडलं जात. कारण गडाचे बांधकाम त्यांनी करून घेतलं होतं. मात्र, या गडाचा इतिहास फार जुना आहे. पौराणिक आख्यायिकेमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी याच ठिकाणी नृत्य केले होते. याच ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि याच ठिकाणाहून ते कैलास पर्वतावर गेले होते. गडावर भुलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची उभारणी 12 व्या शतकात यादवांनी केल्याची इतिहासात नोंद आढळून येते.
शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने फसवून भर दरबारात हत्या केल्याची घटना 16 व्या शतकात घडली होती. या घटनेमुळे निजामशाहीमध्ये असणाऱ्या शहाजी राजांना जबर धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. निजामशाही सोडल्यानंतर इतर कुठल्याच बादशहाच्या दरबारात सामील होण्यापेक्षा शहाजी महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापनेच्या दिशेने हालचाल सुरू केली. शहाजी राजांना पुण्याची जहागिरदारी वडिलोपार्जित मिळाली होती. मात्र, या काळात पुणे आदिलशहाच्या ताब्यात होते. पुणे स्वराज्यात सामील करून घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळे शहाजी राजांना पुण्यावर स्वारी करत पुणे व आजूबाजूचा सर्व परिसर जिंकून घेतला.
शहाजी राजांनी पुणे जिंकून घेतल्यामुळे आदिलशहाचा तिळपापड झाला होता. प्रतिषोधाच्या भावनेने त्याच्या अंगाची लाहीलाही झाली होती. त्याने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फौज घेऊन पुण्यात पाठवले. शहाजी राजे आणि रायराव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या काळात जिजाबाई गरोदर होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावाने अक्षरश: पुणे उद्ध्दवस्त केले. पुणे बेचिराख केले आणि पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला. पुण्याचं मोठं नुकसान झालं होतं.
याच काळात दौलतमंगळ किल्ला उभारला गेला. आदिलशहाच्या दरबारातील मुरार जगदेव हा एक मोठा सरदार होता. शहाजी राजे काही काळ आदिलशाहीच्या दरबारात होते. त्यामुळे शहाजी राजे आणि मुरार जगदेव यांचे चांगले संबंध होते. आदिलशाही फौजांनी पुण्याची नासधूस केल्यानंतर पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी 1629 साली पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडीच्या भोवती बुरूज, तटबंदी बांधून दौलतमंगळ गडाची उभारणी केली.
त्यानंतर पुढील अनेक वर्ष पुण्याचा संपूर्ण लष्करी आणि मुलकी कारभार दौलतमंगळ गडावरून पाहिला जात होता. परंतु 1635 साली मुरार जगदेवाची आदिलशहाने हत्या केली. मुरार जगदेवाची हत्या केल्यानंतर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी केली. लाल महालात आपला मुक्काम हलवला. त्यानंतर पुण्याचा सर्व कारभार लाल महालातून हाकला जात होता. या सर्व धामधुमीत दौलतमंगळ गडाचे महत्त्व आपोआप कमी होत गेले. मात्र, किल्ल्यावरील भुलेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारास व तेथील काही लोकोपयोगी कामांचे बांधकाम करण्यासाठी ब्रम्हेंद्रस्वामींनी एक लाख रुपये खर्च केल्याची नोंद आढळून येते. त्याच बरोबर होळकरांनी सुद्धा या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केली होती.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
दौलतमंगळ गडाचा विस्तार पूर्व पश्चिम अशा स्वरुपाचा आहे. आपला गडावर प्रवेश उत्तरकेडील प्रवेशद्वारातून होतो. गडावरील तटबंदी आणि काही अवशेष नामशेष झाले आहेत. गडावर प्रवेश करताना 2 बुरूज आपले लक्ष वेधून घेतात. गडावर चढण अशी नाहीच. थेट गाडीने गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. गडावर भुलेश्वराचे मंदिर असून प्रवेशद्वारापासून 15 मिनिटे चालत गेल्यानंतर मंदिरामध्ये जाता येते. मंदिराची रचना फार सुंदर करण्यात आली असून अनेक शिल्प आणि काताळात कोरलेले कासव लक्ष वेधून घेते. मंदिर काळ्या पाषणाता बांधण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरील वातावरण कितीही उष्ण असले तरी, मंदिरामध्ये आल्यानंतर प्रचंड थंडावा जाणवतो.
मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालताना गणपती, विठ्ठल रखुमाई आणि महादेवाची छोटी छोटी देवालये पाहण्यासारखी आहेत. देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला जावे. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. तसेच कोठार, आणखी एक महादेवाचे मंदिर अशी काही छोटी छोटी ठिकाण आहेत. संपूर्ण गड आणि मंदिराचे दर्शन घेण्यासाठी साधारण एक तास लागू शकतो.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्याचा एकच मार्ग असून गडावर जाण्यासाठी तुम्हाला पुणे सोलापूर महामार्गावर असणारे यवत हे गाव गाठावे लागणार आहे. पुण्यापासून साधारण 45 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव. पुणे-हडपसर-उरळी कांचन मार्गे तुम्ही यवत गावाता पोहचाल. यवत गावात पोहोचल्यानंतर तुम्हाला यवत पोलीस चौकी लागेल. या पोलीस चौकीच्या अलकीडेच एक वळण उजव्या बाजूने दौलतमंगळ गडावर गेले आहे. यवत गाव ते दौलतमंगळ हे अंतर 10 किलोमीटरचे आहे.
गडावर जेवणाची राहण्याची सोय आहे का
गडावर थेट गाडी जाते. त्यामुळे गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माणसांची वर्दळ असते. त्यामुळे राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय गडावर होऊ शकते. गडावर जेवणाची सोय नसल्यामुळे तुम्हाला तुमची सोय करावी लागणार आहे. रविवार धरून तुम्ही गडावर जाणार असाल तर भुलेश्वर मंदिरात प्रसादाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. भुलेश्वर मंदिरात दर रविवारी प्रसादाचे आयोजन केले आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.