Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात असे अनेक गड आहेत, जे आजही दुर्लक्षीत आहेत. त्यामुळे या गडांचा दिवाळीमध्ये फारसा विचार केला जात नाही. अशा दुर्लक्षीत गडांची (Dhakoba Fort) माहिती सर्वांना व्हावी यासाठी पुढचे काही दिवस दिवाळीचे औचित्य साधत आपण त्यांची माहिती घेणार आहोत. जेणेकरून दिवाळीमध्ये अशा गडांची सुद्धा बांधणी आपल्याला पहायला मिळेल. 

विविधतेने नटलेल्या पुण्याला चहुबाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. या घनदाट जंगलांच्या सानिध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडांची निर्मिती केली. राजगड, तोरणा, सिंहगड, शिवरायांची जन्मभूमि शिवनेरी असे अनेक गड आजही आपला दरारा कायम ठेवून पुण्यात उभे आहेत. मात्र या सर्व गडांमध्ये आजही असे काही गड आहेत. त्या गडांबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही. घाटमार्गाचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडांची निर्मिती केली होती. त्यामुळेच गनीमांवर लक्ष ठेवण्यासाठी धाकोबा गडाची (Dhakoba Fort) निर्मिती झाली असावी. चला तर म जाणून घेऊया गडचा संपूर्ण इतिहास

रक्षणकर्ता धाकोबा

पावसाळी वातावरणात डोळ्यांच पारणं फेडणारी एक पर्वत रांग नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे नजरेस पडते. सह्याद्रीच्या हिरव्या शालूने ही डोंगर रांग सजलेली आहे. धडकी भरवणाऱ्या खड्या कातळ भिंती आणि घनदाट जंगलामुळे या रांगेच्या दहशतीचा अंदाज लावता येतो. प्रामुख्याने या डोंगर रांगेमध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, कुलंग, भटक्यांच्या आवडीचा रतनगड, लव-कुश यांचा आजोबा, हरिश्चंद्रगड, दुर्ग किल्ला, सिद्धगड, नानांचा अंगठा आणि जीवधन या सारखे अनेक गड किंवा शिखरे अगदी थाटात आपलं अस्तित्व टिकवून उभे आहेत.

या डोंगर रांगांमधून प्रवास करण्यासाठी घाटांची निर्मीती करण्यात आली त्यामुळे पावसाळी वातावरणात या मार्गाहून प्रवास करणे स्वर्गाची अनुभूति देणारे ठरते. या घाटांमध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध माळशेज घाट, नाणेघाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, दऱ्या घाट इत्यादी घाट वाटा आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर धाकोबा गड अगदी थाटात उभा आहे. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी धाकोबा गडाची निर्मीती केल्याची इतिहासात नोंद आहे.

धाकोब गड आणि इतिहास

धाकोबा गडा विषयी इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच बरोबर स्वराज्यात हा गड होता का नाही या बद्दलही कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. शिवकाळात आणि त्यानंतरही कल्याण बंदरात उतरणारा माल बाजारपेठांमध्ये पोहचवण्यासाठी मुरबाड, वैशाखरे मार्गे जाणाऱ्या विविध घाट रस्त्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे या घाट मार्गाहून माल सुरक्षित बाजारपेठांमध्ये पोहचावा यासाठी घाट रस्त्यांच्या आजूबाजूला अनेक छोट्या मोठ्या गडांची निर्मिती प्राचीन काळापासून करण्यात आली होती. या सर्व गडांचा उद्देश एकच होता. तो म्हणजे या व्यापारी मार्गाचे रक्षण करणे आणि बाजारपेठांमध्ये चाललेला माल सुस्थितीच पोहोचवण्यासाठी खबरदारी बाळगणे. धाकोबा गडाची रचना पाहता त्याचाही उपयोग हा टेहाळणीसाठी होत असावा अशी शक्यता इतिहासकारांनी वर्तवली आहे.

धाकोबा गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे

धाकोबा गड एका दिवसात संपूर्ण पाहता येतो. गडावरून नाणेघाट, दाऱ्याघाट, जीवधन घाट आणि कोकणाचे देखणे सौंदर्य पाहता येते. धाकोबा गडाचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा, त्यामुळे गडावर कोणतेही अवशेष पहायला मिळत नाहीत. धाकोबा गड उतरून समोरचा डोंगर पार करून पुढे असणार्‍या पठारावर गेल्यास ढाकेश्वराचे मंदिर पहायला मिळते. मंदिरात काही समाध्या असून शेंदूर लावलेल्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली पहायला मिळते. पाणी साठवून ठेवण्यासाठी दगडात कोरलेले एक भांडे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला मोठी विहिर आहे.

गडावर जायचं कसं

धाकोबा गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. खास ट्रेकिंग करायला जाणाऱ्या भटक्यांसाठी आंबोली ते धाकबो हा चढाईचा मार्ग सोईस्कर ठरू शकतो. तर गडावर जाणारा दुसरा मार्ग हा दुर्ग-धाकोबा-आंबोली हा मार्ग सुद्धा सोईस्कर ठरू शकतो. गडावर जाणाऱ्या मार्गांची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आंबोली गावात जाण्याासाठी जुन्नरहून दर तासाला महाराष्ट्र राज्य महामंडळाची एसटी बस धावत असते. त्याच बरोबर आंबोली गावाच्या अलिकडे उच्छिल नावाचं गाव आहे. या गावात जाण्यासाठी एसटी व्यतिरिक्त आपल्या वडाप/झिबडं/जीप यांचा पर्याय उपलब्ध आहेत. आंबोली गावात जिथे रस्ता संपतो तिथून एक वाट दाऱ्या घाटाकडे जाते. हा मार्ग तुम्हाला ढाकेश्वर मंदिरापाशी घेऊन जातो. साधारणपणे आंबोली गावातून ढाकेश्वर मंदिराकडे येण्यासाठी दोन तास लागू शकतात. ढाकेश्वर मंदिरामध्ये क्षणभर विश्रांती घेऊन धाकोबा गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. मंदिरापासून अर्ध्यातासात आपल्याला गडावर पोहचता येते.

गडावर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे दुर्गवाडी मार्गे धाकोबा गड. या मार्गे गडावर जाण्यासाठी जुन्नर हातवीज ही एसटी पकडून हातवीज फाट्यावर उतरावे. जुन्नर हातवीज ही एसटी दिवसातून फक्त दोन वेळा धावते. एक म्हणजे सकाळी 10.30 वाजता आणि दुसरी बस दुपारी 4.00 वाजता. हातवीज फाट्यावर उतरल्यानंतर चालत दुर्गवाडी पर्यंत जावे लागते. हातवीजा फाटा ते दुर्गवाडी हे अंतर साधारण तीन किलोमीटर इतके आहे. खाजगी वाहनाने दुर्गवाडी पर्यंत जाता येते. दुर्गवाडीत पोहचल्यानंतर शासनाच्या माध्यमातून चांगल्या सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर दुर्गादेवीचे आपल्याला दर्शन होते. या ठिकाणी चांगल्या स्थितीत मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या पुढे आपल्याला कोकणकड्याचे विहंगम दृश्य पाहता येते. कोकणकड्याचे देखणे रूप डोळ्यात साठवून पुढे गेल्यानंतर पायवाटेने आपण धाकोबा गडावर पोहोचतो. या वाटेने गडावर जाण्यासाठी अंदाजे 2 ते 3 तास लागू शकतात. तुमच्या चालण्याच्या वेगानुसार वेळेमध्ये फरक असू शकतो.

धाकोबा गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडावर जाताना आपण दुर्ग-धाकोबा-आंबोली किंवा आंबोली-धाकोबा-दुर्ग असा मस्त ट्रेकचा चांगला अनुभव घेऊ शकतो. या गडावर वर्दळ कमी असल्यामुळे आणि बऱ्याच जणांना हा गड माहिती नाही. त्यामुळे रस्ता भटकण्याची शक्यता गडावर जाताना जास्त आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडावर जाताना वाटाड्या किंवा ज्याला या गडावर जाणाऱ्या मार्गाबद्दल चांगली माहिती आहे. अशी एक व्यक्ती तुमच्या सोबत असलीच पाहिजे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का?

धाकोबा गड हा तसा दुर्लक्षीत गड आहे. त्यामुळे गडावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे गडावर जेवणाची किंवा पाण्याची सोय नाही. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात साधारण 15 जणांची राहण्याची सोय आरामात होऊ शकते. मात्र गडावर राहण्यापूर्वी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गोष्टी विचारून घ्याव्यात.

सर्वात महत्त्वाची सुचना

आपला गड आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखा गडावर कचरा करून देऊ नका आणि करू नका.

जय शिवराय


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment