Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. विधानसभा निवडणूक म्हटलं की सांगोला मतदारसंघ गाजवणाऱ्या स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची आठवण आवर्जून काढावी लागते. राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्या सारखा दुसरा नेता अद्याप तरी झाला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही. कारण सध्याच गल्लीच्छ आणि फोडफोडीच राजकारण पाहता निष्ठा या शब्दाला हमखास केराची टोपली दाखवून नेते मंडळी मोकळी होतात. यामुळेच गणपतराव देशमुख यांचे वेगळेपण चिखलात उमलणाऱ्या कमळा सारखे उठून दिसते.

विक्रमी 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणारे, भाई, आबासाहेब अशा विविध नावांनी जमनानसात प्रचतिल असणारे स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांचा भारताच्या लोकशाहीतील आदर्श नेता म्हणून उल्लेख केला जातो. शरद पवारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेते गणपतराव देशमुख यांचा आदराने उल्लेख करतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील या लढवय्या आणि सामान्य माणसांसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या नेत्याचा जीवन प्रवास तरुण मतदरांनी वेळ काढून वाचला पाहिजे.

प्रारंभिक जीवन

गणपराव देशमुख यांचा जन्म सांगोला जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पेनूर या छोट्याशा गावात 10 ऑगस्ट 1927 रोजी झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे सहाजीकच गावच्या मातीशी त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवना बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचा राजकीय प्रवास पाहता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी राजकीय चळवळींमध्ये सहभाग नोंदवला असावा. बोलका स्वभाव आणि सामाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना जाण होती. शेतकऱ्याची व्यथा त्यांनी जवळून पाहिली होती. दुष्काळ, अस्मानी संकट आणि योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी भरडून निघत होता. त्याची व्यथा शहरात राहणाऱ्या सुटा बुटातल्या लोकांपर्यंत पोहचत नव्हती. शेतकरी हा भारताचा मुख्य घटक असला तरी त्यांच्यावर फारसे लक्ष दिले जात नव्हते.

पुण्यात विद्यार्थी दशेत असताना गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापच्या शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील आणि तुळशीदास जाधव या नेत्यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. या काळामध्ये शंकरराव मोरे पुण्यामध्ये मार्क्सवादी विचार तळागळा पर्यंत पोहचवण्यासाठी अभ्यासवर्ग घेत असत. या अभ्यासवर्गाचे गणपतराव देशमुख सुद्धा भाग झाले असावेत. गणपतराव देशमुख यांनी या नेत्यांकडूनच निस्वार्थपणे काम करण्याची शिकवण घेतली आणि त्याचा आपल्या राजकीय जीवनात अवलंबही केला. शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शंकरराव मोरे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 

अन् गणपतराव आमदार झाले

 

वयाच्या 34 व्या वर्षी पहिल्यांदा 1962 साली गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले. पहिल्याच फटक्यात त्यांनी मैदान मारले आणि थेट विधानसभा गाठली. त्यानंतर तब्बल 11 वेळा त्यांनी सांगोला मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. 1962 ते 2014 या काळात फक्त 1972 आणि 1995 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1972 साली त्यांचा पहिल्यांदा पराभव काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी केला, तर 1995 काँग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता सांगोला मतदारसंघातील मतदारांनी सतत गणपतरवांना विजयी केले.

लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा पहिल्यांदा गणपतराव देशमुख यांनी भाषण केले होते. गणपतरावांच्या भाषणाने तेव्हा सर्व प्रभावित झाले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही गणपतरावांचे तोंड भरून कौतुक केले होते.

विरोधी बाकावरून कॅबिनेट मंत्री

शेतकरी कामगार पक्ष विधानसभेच्या रिंगणात फारसा यशस्वी ठरला नाही. एकहाती सत्ता त्यांना कधी मिळवता आली नाही. त्यामुळे गणपतरावांना आपली बहुतांश राजकीय कारकीर्द विरोधी बाकावर काढावी लागली. मात्र, 1978 आणि 1999 साली आलेली सरकारं याला अपवाद ठरली. 1978 साली राज्याच्या राजकारणात पहिला भूकंप शरद पवारांनी आणला असं म्हटल जातं. 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. शरद पवारांनी पुलोदचा यशस्वी प्रयोग केला आणि सत्ता स्थापन केली. या आघाडीत शरद पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष यांचा सहभाग होता. पुलोदच्या प्रयोगामुळे शरद पवार वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे स्वतंत्र भारतातील ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.

सुरुवातील पुलोद सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांवर कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने उत्तमराव पाटील, अर्जुनराव कस्तुरे, निहाल अहमद, सुंदरराव सोळंके आणि गणपदराव देशमुख यांचा समावेश होता. यावेळी उपमुख्यमंत्रिपदी सुंदरराव सोळंके यांची वर्णी लागली होती. पुलोद सरकारमध्ये गणपतराव देशमुख यांच्यावर कॅबीनेट मंत्री म्हणून राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती सोपवण्यात आली होती.

1999 साली शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होती. तेव्हा सुद्धा गणपतरावांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.

एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून ओळख

 

शंकरराव मोरे, सी.डी.देशमुख, केशवराव जेधे, नाना पाटील, माधवराव बागल, तुळशीदास जाधव अशा दिग्गज लोकांनी एकत्र येत शतेकरी कामगार पक्ष उभा केला होता. एक काळ होता जेव्हा नगर जिल्ह्यावर शेकापच्या लाल रंगाची चादर पसरली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर शेकाप सर्वात महत्त्वाचा पक्ष होता. पण नंतर सुरू झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात पक्षाची उतरती कळा सुरू झाली. मात्र, या सर्वात गणपतराव देशमुख यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवत कधीही पक्षाची साथ सोडली नाही. त्यांना अनेक वेळा तशी संधी चालून आली होती.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चाचपणी करणारा सामान्यांचा नेता म्हणून सांगोलामध्ये त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा होता. सांगोल्यामध्ये शेकापचे जे काही अस्तित्व होते ते फक्त गणपतराव देशमुख यांच्यामुळे. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोल्याला मिळावे म्हणून त्यांनी लढा दिला. गणपतरावांना आपल्या संपूर्ण राजकीय कारकि‍र्दीत दोन वेळा मंत्रीपद भुषवले. मात्र, जेव्हा त्यांचे मंत्रिपद गेले त्याच क्षणी त्यांनी सरकारी गाडीला रामराम ठोकला आणि लालपरीने प्रवासाला प्राधान्य दिले. महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये आमदारांसाठी एक सीट राखीव असते. मात्र, या सीट वरून प्रवास करणारा एकमेव आमदार महाराष्ट्रात होऊन गेला. आमदार म्हणून एसटीने प्रवार करणारे गणपतराव देशमुख एकमेव होय. त्यांच्यानंतर एसटीने प्रवास करणारा आमदार होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच लोकं त्यांना एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून ओळखायचे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन्मान

तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. यापूर्वी हा विक्रम तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या नाववर होता. त्यांनी 10 वेळा आमादर म्हणून विजय प्राप्त केला होता. 2014 सालची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही गणपतरावांची शेवटची निवडणूक होती. यावेळी त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतंनी पराभव केला होता. त्यांनी तब्बल 55 वर्ष आमदार म्हणून सांगोला मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 2017 साली गणपतरावांचा सन्मान करण्यात आला होता.

गणपतरावांच निधन आणि पुढची पिढी विधानसभेच्या रिंगणात

महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत, निष्ठावान, सामन्यांचा नेता आणि राजकारणातील एका आदर्श व्यक्तिमत्वाचा वयाच्या 94 वर्षी 30 जुलै 2021 रोजी निधन झाले. गणपतराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा नातू अनिकेत देशमुख याने 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment