माणसांनी तंत्रज्ञानात होणारे बदल वेळोवेळी स्वीकारत त्याचा अंगिकार केला आणि तशा पद्धतीने आपली जीवनशैली बनवली. भारतही या विकासाच्या प्रक्रियेत असून वेगाने प्रगती करत आहे. मात्र, टेक्नॉलॉजीच्या मदतीने जग जिंकू पाहणारा भारत आजही एका गोष्टीत खूप मागे आहे. स्त्री-पुरुष समानतेचे सर्व स्तरावर गोडवे गायले जातात. परंतु या दोन कॅटेगरी सोडून तिसऱ्या कॅटेगरीमधील एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरायला लागली की भारता सारख्या विकसनशील देशाचे नागरिक (सर्वच नाही) नाक मुरडायला सुरुवात करतात. छक्का, हिजडा अशा पद्धतीने अगदी खालच्या पातळीची भाषा संबंधित व्यक्तींबरोबर वापरली जाते. असंख्य टोमन्यांचा सामना त्यांना करावा लागतो. या सर्व टोमण्यांचा, छळाचा अपमानाच सामना करत हार न मानता Pawan Yadav यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण करत महाराष्ट्रातील पहिली ट्रान्सजेंडर वकील होण्याचा बहुमान पटकावला.
मुंबईतील ट्रान्सजेंडर पवन यादव यांचा जीवन प्रवास एखाद्या प्रेरणादायी पुस्तकाप्रमाणे विविध कोडी उलगडणारा आहे. लैगिंक अत्याचार झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी LLB चे शिक्षण पूर्ण करत वकील होण्याचे स्वप्न पूर्ण केले ते खरच कौतुकासपद आणि प्रेरणादायी आहे. 27 वर्षांच्या पवन यादव या महाराष्ट्रातील पहिल्या आणि भारतातील दुसऱ्या ट्रान्सजेंडर वकील आहेत. समाजाचा विरोध झुगारून आपलं स्वत: च अस्तित्व पवन यादव यांनी समाजात निर्माण केले आहे. त्यामुळे हा प्रवास आवर्जून जाणून घेतला पाहिजे. त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
बालपण आणि मित्रांचे टोमणे
पवन यादव यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. हे यादव कुटुंब मुळ उत्तर प्रदेशचे रहिवासी. पवनच्या वडीलांनी नोकरीच्या शोधात मुंबई गाठली आणि त्यामुळे पवनसह त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यामुळे पवनचे सर्व बालपण मुंबईतच गेले. शालेय जीवनात असताना शरीरामध्ये होणारे बदल जाणवायला सुरुवात झाली होती. पवन यादवचे शरीर पुरुषांचे आणि फिलिंग्स स्त्रीची होती. याची जाणीव त्यांना होत होती. त्यामुळे मुलांसोबत खेळताना त्यांना अस्वस्थ वाटत असे. मुलींसोबतही खेळता येत नव्हतं. कारण मुलींसोबत खेळताना दिसलं की मुलं खूप चिडवायचे. लहान असल्यामुळे शरीरामध्ये होणारे बदल पवन यांच्यासाठी नवीन होते. इतर मुलांपेक्षा आपण वेगळे का आहोत? हा प्रश्न त्यांना वारंवार सतावत होता.
पवन यादव अभ्यासामध्ये हुशार होत्या. त्यामुळे चांगल्या गुणांनी त्या उत्तीर्ण होत असत. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यातल्या त्यात रामलीला पात्र हा त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. कारण त्यांना रामलीलेत सीतेची भूमिका करायला मिळत असे. त्या निमित्ताने साडी घालणे, बांगड्या घालणे, काजळ, लिपस्टीक, मेकअप इत्यादी गोष्टी त्यांना करता येत होत्या. विशेष म्हणजे ‘सीता’ या पात्राच्या सहाय्याने त्यांना लोकांमध्ये एका स्त्रीच्या वेशात जाता येत होतं आणि कोणी टोमणेही मारत नव्हतं. वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत पवन यादव यांचे जीवन अगदी सर्व सामान्य होतं. शाळेत जाणे, अभ्यास करणे, मुलांसोबत खेळणे इत्यादी गोष्टी त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुरू होत्या.
बलात्कार झाला अन् आयुष्याला कलाटणी मिळाली
‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे प्रसिद्ध मराठी गाणं तुम्ही एकदा तरी ऐकलं असेल. पवन यादव यांचे आयुष्य या गाण्यामध्ये तंतोतंत फिट झालं. मात्र, पवन यादव यांच्यासाठी सोळावं नाही पण चौदावे वर्ष अत्यंत धोक्याच ठरलं. त्यामुळे त्यांच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. पवन यादव यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे यादव कुटुंब पुरतं हादरून गेलं होतं. आयुष्यात कधी विचारही केला नव्हता अशा वाईट प्रसंगाला पवन यांच्यासह यादव कुटुंबाला समोर जावं लागलं. मुलावर कधी बलात्कार होतो का? असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत होता. अशा कठीण प्रसंगात समाजाने पाठीशी खंबीर उभं राहण्याची गरज होती. मात्र, हाच समाज त्यांच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगत होता.
क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास
या काळात पनन यांच्या आई-वडीलांना प्रचंड त्रास देण्यात आला. तुमच्या मुलावर रेप झालाय? मुलांवर कधी बलात्कार होता का? तुमचा मुलगा आहे की मुलगी? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार पवनच्या आई-वडीलांवर होता होता. याचा पवन यांच्या प्रचंड वाईट परिणाम झाला. त्या खचून गेल्या विष पिऊन आत्महत्या करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र, अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा समाजाने टोकून बोलण्याची एकही संधी सोडली नाही. हा समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, अशा पद्धतीची भाषा वापरण्यात आली. समाजाने नाकारल्यानंतर न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देईल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु इथेही भ्रमनिरास झाला. इथून पवन यादव यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.
ग्रॅज्यूएशने ते वकील
लैगिंक अत्याचार झाल्यानंतर यादव कुटुंबाला सतत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. शेवटी वैतागून आई-वडीलांनी पवन यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, एक दिवस सगळं ठीक होईल, असे सांगत पवन यांनी आई-वडीलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. बलात्काराची जखम त्यांच्या ह्रदयात खोलवर रूतली होती. या सर्व परिस्थितीचा सामना करत पवन त्यांनी एका बाजूने आपलं शिक्षण सुरू ठेवलं. 2016 साली पवन यांनी केमिस्ट्री विषय घेऊन विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला आणि नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, लोकांचा त्रास, टोचून बोलणं त्यांचा काही पिच्छा सोडतं नव्हत. नातेवाईकांनी सुद्धा हात वर करत मुंबई सोडण्याचा सल्ला दिला. मात्र, पवन यादव आपल्या निर्णयावर ठाम होते.
Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया
कोणावरही अवलंबून न राहता आपली लढाई आपणच लढायची हे मनाशी पक्कं करून पवन यांनी खाजगी कंपनीची नोकरी सोडली आणि गुजरातवरून पुन्हा एकदा मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. CET लॉची प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या. मात्र, महाविद्यालयात प्रवेश घेताना पुन्हा एकदा जेंडर आडवं आलं. त्या जेव्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी गेल्या, तेव्हा फॉर्म भरताना स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर असे तीन कॉलम फॉर्ममध्ये होते. त्यांनी अगदी विचारपूर्वक ट्रान्सजेंडर या कॉलमवर खूण केली. मात्र, तिथल्या सरांनी पवन यादव यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आणि जागा नसल्याचे सांगत प्रवेश नाकारला.
CET उत्तीर्ण करूनही त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. परंतु त्यांनी हार न मानता आपला लढा सुरूच ठेवला. या काळात त्यांनी अनेक सामाजीक संस्था, मानवी हक्क कार्यकर्ते, विविध ट्र्स्टी यांची भेट घेतली. याचं फळ म्हणजे त्यांना लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. परंतु यावेळी त्यांनी प्रवेश घेताना आपली खरी ओळख लपवली. प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय उरला नव्हता. पवन यांना मेकअप करण्याची प्रचंड आवड होती. मात्र, शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी या सर्व गोष्टींचा त्याग केला. कॉलेजमध्ये जाताना पॅंट शर्ट आणि घरी असताना साडी असा त्यांचा दुहेरी संघर्ष सुरू होता. त्याच लोकांच टोचून बोलणं सुरूच होतं. मात्र, पवन यांच्या आई-वडीलांनी त्यांना कधीही प्रेमापोटी घराबाहेर काढलं नाही.
आई-वडीलांन होणारा त्रास सहन न झाल्याने त्यांनी घर सोडायचा निर्णय घेतला आणि एका ट्रान्सजेंडर मैत्रिनीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पवन यादव यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली असून नुकतचं महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये त्यांच रजिस्ट्रेशन झालं आहे. पवन यादव आता मुंबईतल्या बोरीवली आणि दिंडोशी कोर्टात अॅडव्होकेट म्हणून काम करणार आहेत.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.