Surekha Yadav – कधी विचारही केला नव्हता ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं; सातारच्या लेकीची गगनभरारी, वाचा सविस्तर…

भारताच नाव उज्ज्वल करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक स्त्रिया महाराष्ट्राच्या मातीत घडल्या आणि घडत आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेला यशाचा सुरूंग लावत अनेक महिलांनी आपल्या नावाच डंका जगभरात वाजवला आहे. क्षेत्र कोणतेही असो महिलांनी आपली एक विशिष्ट जागा प्रत्येक क्षेत्रात निर्माण केली आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई भोसले, सरसेनापती उमाबाई दाभाडे, डॉ. आनंदिबाई जोशी, सावित्रीबाई फुले, लता मंगशेकर, प्रतिभाताई पाटील इ. अशा अनेक महान महिला महाराष्ट्राच्या मातीत घडल्या. भविष्यात या नावांच्या यादीमध्ये अशीच वाढ होत जाईल. तत्पूर्वी या यादीमध्ये आणखी एका नावाची आवर्जून नोंद करावी लागेल ते नाव म्हणजे Surekha Yadav.

सुरेखा शंकर यादव या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. मुळ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या नावाचा डंका त्यांनी जगभरात वाजवला आहे. 1998 साली त्यांनी पहिल्यांदा लोको पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली. शिक्षक होण्याच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, नशीबाच्या डायरीत लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहले होते. मध्य रेल्वेसाठी त्यांनी पहिली ‘Ladies Special’ लोकल ट्रेन चालवण्याची किमया साधली. सुरेखा यादव यांचा शेतकरी कुटुंबातून लोको पायलट होण्या पर्यंतचा प्रवास तितका सोपा नव्हता. परंतु लढवय्या स्वभाव आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगत सुरेखा यादव यांनी पुरुषांचे वर्चस्व असणार्‍या क्षेत्रात उडी मारली आणि स्वत: ला सिद्ध करत आपल्या नावाची दखल साऱ्या जगाला घ्यायला लावली.

Surekha Yadav यांचे प्रारंभिक जीवन

मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून नावलौकिक असणाऱ्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात 2 सप्टेंबर 1965 रोजी सोनाबाई रामचंद्र भोसले यांच्या पोटी सुरेखा यादव यांचा जन्म झाला. वडील रामचंद्र भोसले हे हाडाचे शेतकरी. त्यामुळे लहानपणापासूनच गावच्या मातीशी त्यांची नाळ जोडली गेली होती. पाच भावंडांमध्ये मोठ्या असलेल्या सुरेखा या अभ्यासात तितक्याच हुशार होत्या. प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्हेंट हायस्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांनी कराड गाठले. कराड येथील शासकिय पॉलिटेक्निकमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. सुरेखा यादव यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांचा कल हा शिक्षक होण्याच्या दिशेने होता. त्यांना शिक्षक व्हायचे होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते.

अन् सुरेखा यादव यांना पहिली संधी मिळाली

शिक्षण होण्याचे स्वप्न सुरेखा यादव यांनी उराशी बाळगलं होतं. त्यामुळे त्यांनी B.Sc किंवा B.Ed. करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 1986 हे साल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. लोको पायलट होण्यासाठी त्यांनी फॉर्म भरला आणि त्याच वर्षी त्यांची लेखी परीक्षा पार पडली. मात्र, ज्यावेळी त्या परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेल्या तेव्हा सर्व पुरुषांमध्ये त्या एकमेव महिला होत्या. त्यामुळे त्यांना पहिला थोडा धक्का बसला.

परंतु त्यांनी माघार न घेता परीक्षा देऊन उत्तीर्णही केली. त्यानंतर मुलाखतीचाही टप्पा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला आणि कल्याण येथील ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी उत्तमरित्या पूर्ण केले आणि 1989 साली नियमित सहाय्यक चालक पदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. खऱ्या अर्थाने याच दिवशी पुरुषांच्या अनेक वर्षांपासूनच्या वर्चस्वाला सुरेखा यादव यांनी दणका दिला आणि महिलाही या क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकतात हे दाखवून दिले.

फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतली भरारी

सुरेखा यादव यांची सहाय्यक चालक पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्यावर मालगाडी चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी पायलट म्हणून पहिल्यांदा वाडीबंदर ते कल्याण या मार्गावर धावणाऱ्या L-50 या क्रमांकाच्या मालगाडीचे सारथ्य केले होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी इंजिन कशा पद्धतीने हाताळायचे तसेच सिग्नल यंत्रणे संबंधित सर्व कामांमध्ये त्या तरबेज झाल्या. त्यांच्या या मेहनतीची खरी पावती त्यांना 1998 साली मिळाली. कारण याच वर्षी सुरेखा यादव यांनी त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला त्या एक परिपूर्ण मालगाडी चालक बनल्या.

पश्चिम घाटाची राणी

सुरेखा यादव यांनी लोको पायलट म्हणून पदभार स्विकारल्यानंतर चांगले काम केले. त्यामुळेच त्यांची महाराष्ट्रातील अवघड अशा पश्चिम घाटात पायलट म्हणून नेमणूक करण्यात आली. मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनचे सारथ्या करणाऱ्या आशिया खंडातील त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या. त्याच्या यशाचा आलेख सतत उंचावत गेला. त्यांचे काम आणि कामप्रती असणारी सचोटी पाहून वेळोवेळी त्यांना पदोन्नती मिळत गेली. मुंबई-पुणे या आव्हानात्मक मार्गावर त्यांनी न घाबरता डेक्कन क्वीन चालवली. त्यांच्या या धाडसाच सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आणि 2011 साली आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून त्यांचा सन्मानही करण्यात आला.

दरम्यान, सन 2000 साली ममता बॅनर्जी यांनी महिलांसाठी एक विशेष ट्रेन सुरू केली होती. या ट्रेनेच वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन चालवण्याची जबाबदारी सुरेखा यादव यांच्या खांद्यावर सोपण्यात आली होती. त्यामुळे एक प्रकारे राजकीय स्तरावर सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा व्हायला 2000 सालापासूनच सुरुवात झाली होती. 2011 साली त्यांच्या कामाचा व्याप अजून वाढवण्यात आला आणि त्यांना लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सुरेख यादव सध्या कल्याण येथील Drivers Training Center (DTC) मध्ये वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यत त्यांनी असंख्य तरुण तरुणींना यशस्वीरित्या ट्रेनिंग दिले आहे.

महिलांचा लोको पायलट या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला

सुरेखा यादव यांनी खऱ्या अर्थाने लोको पायलट या क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. पुरुषांच या क्षेत्रामध्ये वर्चस्व होतं. मात्र, त्यांच्या या वर्चस्वाला सुरेखा यादव यांनी सुरूंग लावला आणि पहिल्या महिला लोको पायलट होण्याचा बहुमान पटकावला. गेल्या काही वर्षांमध्ये सुरेखा यादव यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणी सुद्धा या क्षेत्राकडे वळायला लागल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार जवळपास 1500 ते 1700 महिला या लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट अशा विविध पदांवर भाराताच्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. पुरुषांच्या जोडीने महिलांची संख्या सुद्धा या क्षेत्रामध्ये आता झपाट्याने वाढत आहे. खऱ्या अर्थाने याचे सर्व श्रेय सुरेखा यादव यांना द्यावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले

2021 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिला विशेष ट्रे मुंबई लखनऊ या मार्गावर सुरेखा यादव यांनी चालवली. त्याच बरोबर 13 मार्च 2023 रोजी पुन्हा एकदा सुरेखा यादव यांनी इतिहास घडवला. सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या 455 किलोमीटरच्या मार्गावर सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. याच गोष्टीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये सुरेखा यादव यांचे नाव घेत कौतुक केलं.

विविध पुरस्कारांवर उमटवली मोहोर

सुरेखा यादव या लाखो महिलांच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडे पाहून अनेक तरुणींनी लोको पायलट होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. तसेच पालकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून वेळोवेळी कौतुक करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मानही करण्यात आला. सुरेखा यादव यांना पहिल्यांदा 1998 साली जिजाऊ पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2001 साली वुमन अॅचिव्हर्स अवॉर्ड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने दिल्ली येथे सन्मान, 2002 साली लोकमत सखी मंच येथे गौरव, 2004 साली सह्याद्री हिरकणी पुरस्कार, 2005 साली प्रेरणा पुरस्कार, 2011 साली मध्य रेल्वेच्या माध्यमातून वुमन अॅचिव्हर्स अवॉर्ड देण्यात आला. त्याच बरोबर 5 एप्रिल 2013 साली भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून RWCC सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi

सुरेखा यादव यांच्या या झंझावाती कारकि‍र्दीत त्यांचे पती शंकर यादव यांनी सुद्धा मोलाची साथ दिली. 1990 साली दोघांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत. शंकर यादव सुद्धा सरकारी सेवेत असून पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांची दोन्ही मुलं इंजिनिअर असून चांगल्या पदावर काम करत आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment