Arunima Sinha – रेल्वे अपघातात पाय गमावला, पण हार न मानता इतिहास रचला

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करत येतात. त्यासाठी सुरुवात करावी लागते, पुढचं पाऊल टाकावं लागतं, रिस्क घ्यावी लागते. अशीच रिस्क Arunima Sinha यांनी घेतली आणि त्यांच्या नावाची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांची यशोगाथा प्रत्येक व्यक्तिला प्रेरणा देणारी आहे.

रेल्वे अपघातात एक पाय गमवावा लागला परंतु त्यांनी हार मानली नाही आणि जगातील सर्वात उंच शिखर माऊंउ एव्हरेस्टवर चढाई केली. विशेष बाब म्हणजे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा या भारातातील पहिल्या दिव्यांग महिला ठरल्या. त्यांमुळे त्यांचा प्रवास जाणून घेणं गरेजेचं आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. अपयश आलं म्हणून आत्महत्या करणाऱ्यांना अरुणिमा यांनी मोठी चपराक देत स्वत:ला सिद्द केले आहे. 

प्रारंभिक जीवन

अरुणिमा सिन्हा यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात 20 जुलै 1988 रोजी आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश येथे झाला. तिचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत होते आणि तिची आई आरोग्य विभागात पर्यवेक्षक होती. लहानपणापासूनच अरुणिमाला खेळाची प्रचंड आवड होती. ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल आणि फुटबॉलमध्ये तिने सक्रियपणे भाग घेत असे. त्याच बरोबर अभ्यासातही ती प्रचंड हुशार होती. व्हॉलीबॉलमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. त्यामुळे राष्ट्री स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. एक खेळाडू म्हणून त्यांच्या कारकिर्दीची भरभराट व्हायला सुरुवात झाली होती. 

मर्यादित साधनसामग्री असूनही, अरुणिमाच्या कुटुंबाने तिच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा दिला, खेळात उत्कृष्ट होण्याच्या तिच्या मोहिमेला प्रोत्साहन दिले. तथापि, तिच्या आयुष्याला 2011 मध्ये कलाटणी मिळाली. काळजाचा थरका उडावा अशी घटना तिच्या सोबत घडली.

अन् अरुणिमा यांना पाय गमवावा लागला

11 एप्रिल 2011 रोजी अरुणिमा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) परीक्षेत सहभागी होण्यासाठी लखनौहून दिल्लीला ट्रेनने जात होत्या. प्रवासादरम्यान, त्यांना चोरट्यांचा सामना करावा लागला.  चोरांनी संधी साधत अरुणिमाचे सर्व सामान हिसकावण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाने प्रतिकार केला असता तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. ती रुळावर पडली. याच वेळी समोरून आलेल्या दुसऱ्या ट्रेनच्या खाली त्यांचा डावा पाय गुडघ्याखाली कापला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार उघड झाला आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला होता. परंतु सुदैवाने या अपघातात अरुणिमा यांचा जीव वाचला. परंतु त्यासाठी त्यांना त्यांच्या पायाची आहुती द्यावी लागली. जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा पाय कापला. या अचानक आलेल्या संकटामुळे अरुणिमा सुरुवातीला पूर्ण खचून गेल्या होत्या. दिव्यांगतेचा भार त्यामुळे हृद्यावर खोल झकमा झाल्या होत्या. परंतु त्यांनी हार मानली नाही.

 अव्हानांचा सामना 

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना अरुणिमा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. अपंगत्वाला केराची टोपली दाखवत गरुड झेप घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये त्यांनी उपचारादरम्यान माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचा संकल्प मनाशी केला. शारीरिक, मानसिक किंवा भावनिक आव्हानांना तोंड देत असलेल्या लाखो लोकांना प्रेरणा देण्याचा तिच्या निर्णयाचा एक सखोल उद्देश देखील होता.

आणि तयारीला सुरुवात झाली

अरुणिमाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले. त्यांनी कठोर शारीरिक आणि मानसिक तयारी, पर्वतारोहण तंत्रांचे प्रशिक्षण, सहनशक्ती आणि लवचिकतेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. माऊंट एव्हरेस्टवर चढण्याचा अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी प्रशिक्षणा दरम्यान नेपाळमधील आयलँड पीक (6,189 मीटर) सारखी लहान शिखरे सर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडली. अरुणिमा यांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये कुटुंब, मित्र आणि मार्गदर्शकांनी पाठिंबा दिला.

माउंट एव्हरेस्ट सर करत इतिहास रचला

21 मे 2013 रोजी, अरुणिमा सिन्हा यांनी स्वप्न पूर्ण केले आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली दिव्यांग महिला बनली. भारताच्या इतिहासात त्यांच्या नावाची नोंद सुवर्ण अक्षरांनी करण्यात आली. त्यांचा ऐतिहासिक पराक्रम मानवी इच्छाशक्ती आणि लवचिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रतिकूल हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि कृत्रिम पायामुळे उद्भवलेल्या शारीरिक मर्यादांवर मात करून त्यांनी,  हे सिद्ध केले की कोणताही अडथळा तुमच्या स्वप्नांच्या आड येत नाही. फक्त तुमच्या अंगी स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे.

अरुणिमाच्या यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचा व्यापक परिणाम दिसून आला. जगभरातील लाखो लोकांच्या त्या प्रेरणा आहेत. त्यांचे यश इतरांसाठी आशेचा किरण बनले, इतरांना त्यांच्यासमोरील आव्हानांची पर्वा न करता त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास एकप्रकारे त्यांनी प्रोत्साहित केले.

एव्हरेस्टच्या पलीकडे जीवन

अरुणिमाचा प्रवास माउंट एव्हरेस्टवर संपला नाही. त्यांची लढाई सुरुच होती. त्यांनी सातही खंडांवरील सर्वोच्च शिखरे सर करण्याचा संकल्प केला होता.  ज्याला सेव्हन समिट म्हणून ओळखले जाते. त्यांनी हे स्वप्नही 2019 साली पूर्ण केले. 

1. माउंट एव्हरेस्ट (आशिया).
2. माउंट किलीमांजारो (आफ्रिका).
3. माउंट एल्ब्रस (युरोप).
4. माउंट कोशियुस्को (ऑस्ट्रेलिया).
5. माउंट अकोन्कागुआ (दक्षिण अमेरिका).
6. माउंट डेनाली (उत्तर अमेरिका).
7. माउंट विन्सन (अंटार्क्टिका).

पर्वतारोहणातील तिच्या कर्तृत्वामुळे तिला 2015 मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीसह अनेक पुरस्कार मिळाले.

प्रेरणादायी कार्य

अरुणिमा सिन्हा यांच्या यशाने तिचे रूपांतर प्रेरक वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये झाले. तिने तिचे आत्मचरित्र लिहिले, “बॉर्न अगेन ऑन द माउंटन,” जे त्यांच्या खडतर प्रवासाचे वर्णन करते. त्याच बरोबर त्यांनी “अरुणिमा फाऊंडेशन”ची स्थापना केली, ही एक ना-नफा संस्था आहे जी अपंग व्यक्ती आणि वंचित तरुणांना सक्षम करण्यासाठी काम करते. या प्लॅटफॉर्मद्वारे, ती शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि गरजूंना मदत करते, सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या तिच्या वचनबद्धतेला मूर्त स्वरूप देण्याचे काम त्या करत आहेत.

अरुणिमा सिन्हा यांच्यामुळे काही गोष्टी या सर्वांनाच शिकायला मिळतात

1. संकटाचा सामना करताना धैर्य – अरुणिमाने जीवनात बदल घडवणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागले, पण पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
निर्धाराने त्यांच्यावर मात केली.
2. स्वप्नाची शक्ती – महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केल्याने जीवन बदलू शकते, मग ते कितीही कठीण वाटत असले तरीही.
3. लवचिकता आणि कठोर परिश्रम – यश हे चिकाटी, शिस्त आणि एखाद्याच्या ध्येयांप्रती अटळ वचनबद्धतेचा परिणाम आहे.
4. इतरांना सक्षम बनवणे – अरुणिमाचे परोपकारी प्रयत्न समाजाला परत देण्याचे आणि इतरांचे उत्थान करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.

अरुणिमा सिन्हा यांचा हा संपूर्ण प्रवास दृढनिश्चय आणि धाडसाच्या जोरावर एखादी व्यक्ती ज्या विलक्षण उंचीवर भरारी घेऊ शकते, त्याचा पुरावा आहे. जीवन बदलणाऱ्या शोकांतिकेपासून जगातील सर्वोच्च शिखरे जिंकण्यापर्यंतचा तिचा प्रवास सर्व स्तरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. अरुणिमा यांनी लाखो लोकांना प्रेरित केले आहे. तसेच त्यांनी सिद्द करुन दाखवले की उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलाठी अढतळा आडवा येत नाही. 

Leave a comment