Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका पदरावर विराजमान आहे. पावसाळी वातावरणात गडाचं सौंदर्य असंख्य फुलांनी बहरतं. गडावर आणि गडाच्या परिसरात तोरण जातीच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यामुळे या गडाला नाव तोरणा असे पडले. 

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यामध्ये तोरणा गड अगदी थाटात उभा आहे. वेल्हा तालुक्यातून सह्याद्रीच्या दोन रांगांमधून दोन पदर पूर्वेच्या दिशेने पसरत गेलेले निदर्शनास येतात. शिवकाळाता आणि आताही हे दोन्ही पदर महत्त्वाचे आहेत. कारण या या पदारांपैकी एका पदरावर तोरणा आणि दुसऱ्या पदरावर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे. राजगड ज्या सह्याद्रीच्या रांगेवर विराजमान आहे. त्या रांगेला भुलेश्वर रांग असे म्हणतात. तोरणा गडाच्या आजूबाजूला दक्षिणेकडे वेळवंडी नदीचे खोरे आणि उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. एकप्रकारे दोन्ही बाजूंनी नद्यांच्या खोऱ्यांनी तोरणा गडाला वेढलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. या गडावर भ्रमंती करण म्हणजे स्वर्गात डोकावून येण्यासारखं आहे. त्यामुळे तोरणा गडाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

Torna Fort आणि इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला होता. स्वराज्या स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा. इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले. गडाचा विस्तार प्रचंड होता. एकाच टप्प्यात गडावर सर्वत्र नजर मारणे शक्य होत नाही. गडाच्या प्रचंड विस्तारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना गडाचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. त्यामुळे तोरणा गड दोन्ही नावांनी ओळखला जातो.

इ.स 1470 ते 1486 च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने तोरणा गड जिंकल्याची इतिहासात नोंद आढळून येते. गडावर काही लेणी आणि मंदिरांचे अवशेष आहे. यावरून हा गडावर शैवपंथाचा आश्रम असावा अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र, हा तोरणा कोणी आणि कधी बांधला याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकून घेण्यापूर्वी तोरणा निजामशाहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकून घेतला आणि त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. 5 हजार होन इतका खर्च त्यांनी गडावरील कामांसाठी केला

शिवरायांनी भविष्याच्या दृष्टीने गडावर काही इमारती बांधून घेतल्या होत्या. अनेक गडांचा जीर्णोद्वार केला. या गडांमध्ये तोरणा गडाचा सुद्धा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजा जेव्हा आग्र्याहून परत आल्यानंतर 5 हजार होन इतका खर्च शिवरायांनी तोरणा गड बांधण्यासाठी केला होता. तोरणा म्हणजे स्वराज्याचा मानबिंदू होय. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत गड स्वराज्यात होता. त्यानंतर मुघलांनी हरिव निशाण गडावर फडकवलं. हा आनंद मुघलांना फार काळ टिकवून ठेवता आला नाही. शंकराजी नारायण सचिव यांनी मर्दुमकी दाखवत मुघलांच्या ताब्यातून तोरणा पुन्हा जिंकून घेतला.

औरंगजेब शांत बसण्यारातला नव्हता त्याने इ.स 1704 साली तोरणा गडाला वेढा घातला व मराठ्यांची तुंबळ युद्ध केले व गड जिंकून घेतला. औरंगजेबासाठी हा मोठा विजय होता. कारण इतक्या अतिविराट आणि दुर्गम गड ताब्यात घेणं मुघलांसाठी सोप नव्हत. गड जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाने गडाचे नाव ‘फुतुउल्गैब’ असे ठेवले. फुतुउल्गैबचा अर्थ होतो एक मोठा आणि दैवी विजय. औरंगजेबाचा हा दैवी विजय फक्त चार वर्ष टिकला. गडाला मुघलांच्या ताब्यात राहणं पसंत नव्हत. गडाची हाक सरनोबत नागोजी कोकाटे यांनी ऐकली आणि गडावर चाल केली. गडाच्या चारी बाजूंनी मराठ्यांच्या फौजा गडावर चढल्या आणि गड पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला.

सरनोबत नागोजी कोकोटे यांनी गड जिंकून घेतल्यानंतर गड मराठ्यांच्याच ताब्यात होता. पुरंदर तह झाला तेव्हा काही गड मुघलांच्या ताब्यात गेले होते. त्यामध्ये तोरणा गडाचा समावेश नव्हता. तोरणा गडाचे वैशिष्ट्य म्हणजे औरंगजेबाला लढाऊ करून जिंकता आलेला मराठ्यांचा हा एकमेव गड आहे.

गडाची सध्याची स्थिती

तोरणा समुद्रसपाटीपासून साधारण 4 हजार 600 फूट उंचीवर आहे. राजगडावर असणारी सुवेळा आणि संजीवनी माची तर तोरणावर असणारी झुंझार आणि बुधला माची. या दोन्ही माचींच्या मधोमध उंचीवर गडाचा बालेकिल्ला आहे. गडाच्या बांधणीत महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. गडाचे संरक्षणाच्या दृष्टीने फुटका, भेल, साफेली, मालेचा, हनुमान असे अनेक बुरूज गडावर आहेत. गडाची सध्याची अवस्था एकदम उत्तम असून गडाला आवर्जून भेट द्यावी.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

वेल्हे गावातून आपला गडावर जाण्याचा मार्ग सुरू होतो. गडावर राजगड गडावरूनही जाता येते. बरेच दुर्गप्रेमी राजगड-तोरणा किंवा तोरणा-राजगड असा रेंज ट्रेकसुद्धा करतात. तोरणा गडावर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले दर्शन होईल ते बिनी या दरवाजाचे. बिनी दरवाजा पार करून वरती गेल्यानंतर कोठी दरवाजा तुमची वाट पाहत उभा असेल. याच दरवाजा जवळ तोरणजाई देवीचे मंदिर आहे. मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्यावे. दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिरासमोर असलेले दोन तलाव तुमचे लक्ष वेधून घेतली. तलावांची रचना खूपच सुंदर असून काही वेळ तलावाच्या काठी नक्कीच घालवावा.

तलाव पाहून झाल्यानंतर काही उद्ध्वस्त झालेल्या घरांचे अवशेष तुम्हाला पहायला मिळतील. घऱ पाहून त्याच मार्गे गडाच्या माथ्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. गडाच्या माथ्यावर आल्यानंतर मेंगाई देवीचे मंदिर तुमच्या नजरेस पडेल. मेंगाई देवीच्या मंदिरा शेजारी तोरणेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा मंदिराच्या मागच्या बाजूला दोन पाण्याची टाकी पाहण्यासारखी आहेत. गडाच्या माथ्यावर आल्यानंतर गडाची भव्यता दर्शवणाऱ्या झुंझार, बुधला आणि विशाळा या माच्यांवर जाण्याचा मार्ग सुरू होतो. गडावर असणाऱ्या मेंगाई देवीच्या पूर्वेला झुंझार माचीला आहे.

मेंगाई देवी ते झूंझार माची हे अंतर पार करत असाताना वाटेत अनेक पडक्या अवस्थेतील घर पहायला मिळतात. झुंझार माची पाहून झाल्यानंतर आल्या वाटेनेच परत मेंगाई देवीच्या मंदिरात यावे. त्यानंतर गडावर हत्तीमाळ, पाण्याची टाकी, वंकजाई दरवाजा, बुधला माची यासारख्या अनेक गोष्टी गडावर पाहण्यासारख्या आहेत. विशाल माचीच्या दिशेने जाताना लागणारा चित्ता दरवाजा सुद्धा पाहण्यासारखा आहे. संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारण चार ते पाच तास लागू शकतात.

गडावर जायचे कसे

गडावर जाण्यासाठी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या वेल्हे या गावात यावे लागणार आहे. वेल्हे हे तोरणा गडाच्या पायथ्याला असणारे गाव आहे. मुंबई-बंगळुरू या महामार्गावर असणाऱ्या नसरापूर येथून मुंबई वरून येताना उजवीकडे आणि कोल्हापूर किंवा साताराहून येताना डावीकडे वळण घेऊन वेल्हे गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. नसरापूरत येथून वेल्हेला जाण्यासाठी एसटी बस किंवा जीब मिळते. नसरापूर ते वेल्हे हे 29 किमीचे अंतर आहे.

गडावर राहण्याची सोय आहे का

गडावर दोन तीन मंदिरे आहेत. यापैकी मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये 10 ते 13 जण आरामात राहू शकतात. गडावर पाण्याची अनेक टाकी आहेत. तसेच मेंगाई देवीच्या मंदिरा समोरच बारामाही पाण्याचे टाके आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय गडावर होऊ शकते. गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर येताना जेवणाची व्यवस्ता आपली आपणच करावी.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment