Khuni Ganpati – एकीकडे अजान दुसरीकडे आरती; काय आहे मानाच्या ‘खुनी गणपती’चा इतिहास?

महाराष्ट्र गणरायाच्या आगमनात तल्लीन झाला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाच आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचे लाड पुरवले जातील, त्याची मनोभावे सेवा केली जाईल. पुणे आणि मुंबईमध्ये गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. धुळ्यात सुद्धा गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून धुळ्यातील मानाच्या “खुनी गणपती”चे (Khuni Ganpati) सुद्धा थाटात आगमन झालं आहे. खुनी गणपती हे नाव ऐकताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल की, गणपतीच नावं असं का? चला धुळ्यातील या मानाच्या गणपतीचा इतिहास जाणून घेऊया.

लोकमान्य टिळकांनी 1883 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. खुनी गणपतीची स्थापना 1865 साली झाल्याच मानलं जातं. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून 1895 साली खांबेट गुरुजींनी धुळ्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. गणरायाची मनोभावे पुजा अर्चा करण्यात आली. त्यामुळे धुळ्यात एकप्रकारे गणरायाच्या आगमनामुळे प्रसन्नतेच वातावरण होतं. दहा दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर वाजत गाजत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपतीची मिरवणूक सायंकाळच्या सुमारास 1000 वर्ष जुन्या शाही जामा मशिदीजवळ आली. यावेळी मशि‍दीमध्ये प्रार्थना सुरू होती याचवेळी गणपती पालखीतून विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होत होता.

मशि‍दीजवळ मिरवणूक आली असता पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रूपांतर हिंसेत झालं. त्यामुळे ब्रिटिशांनी जमावार बेछूट गोळीबार केला आणि या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला तर, अनेक जण जखमी झाले. या सर्व अनपेक्षित प्रकारामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांचा शेवट म्हणजे या मशि‍दीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती असं नाव मिळालं. तेव्हापासून हा गणपती खुनी गणपती म्हणून प्रचलित झाला.

ब्रिटिशांच्या पुढाकारामुळे दोन्ही गट शांत झाले. यावेळी ब्रिटिशांनी दोन्ही गटांना 228 रुपये दिले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली. तेव्हापासून सुरू झालेली ही प्रथा आजही सुरू आहे. गणपतीच विसर्जन दर अनंत चतुर्दशीला पालखीतून केलं जातं. जेव्हा पालखीतून गणपती विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होतो तेव्हा, टाळ-मृदुंगाच्या तालावर पारंपरिक तिनपावली आणि बारापावली नृत्य होतं. प्रसन्न आणि उत्साहाच्या वातावरणात गणपती सायंकाळी 5 वाजता नमाजाची अजान होत असताना गण खुनी मशि‍दीच्या समोर येतो. मशि‍दीचे मौलाना आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात. हे दृश्य पाहण्यासारखं असतं कारण एकीकडे आरती सुरू असते आणि दुसरीकडे अजान सुरू असते. इथे आरती झाल्यानंतरच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. त्यामुळे या गणपतीला हिंदू-मुस्लीम एक्याच प्रतिक सुद्धा म्हटलं जातं.