Wai News – कृष्णाकाठी कुंभमेळा, पण मंत्रात नावच नाही! विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा संतप्त सवाल आणि तीव्र विरोध

वाई (Wai News) येथे कृष्णा नदीच्या काठावर होणाऱ्या लघु कुंभमेळ्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने जोरदार आक्षेप घेतला आहे. कृष्णा नदी पवित्र मानली जात असताना सप्तगंगा मंत्रामध्ये तिचा उल्लेख का नाही, याबाबत आयोजकांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मेळाव्यामागे धार्मिकतेपेक्षा राजकीय हेतू असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे, तसेच प्रवक्ते अविनाश कदम आणि विजय मांडके यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एवढा मोठा खर्च करून नेमके काय साध्य होणार, बेरोजगारांना रोजगार मिळणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या कार्यक्रमामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण होणार नाही ना, याची खात्री आयोजकांनी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रभातने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

याचबरोबर मेळाव्याच्या कालावधीत वाईतील मंडई आणि मासेविक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अशा खर्चिक कार्यक्रमांची गरज काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत केवळ बाह्य कर्मकांडातून काही साध्य होत नाही, तर अंतःकरणातील भक्ती आणि परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे संघटनेने अधोरेखित केले. वाईला धर्मसुधारकांची परंपरा लाभलेली असताना बाहेरून येणाऱ्या तथाकथित साधूंनी लोकांना मार्गदर्शन करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत या लघु कुंभमेळ्याचा निषेध करण्यात आला आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!