Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या शेजारी विसापूर हा गड व भाजे आणि बेडसे या प्रसिद्ध लेण्या आहेत.

Lohagad Fort आणि इतिहास

लोहगड

लोहगडाचा इतिहास फार जूना आहे. लोहगड बांधला कोणी याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, लोहगडाच्या शेजारी असणाऱ्या भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्यांची जवळपास सत्तावीसशे वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली असावी. जाणकारांच्या मते याच कालखंडामध्ये लोहगड बांधण्यात आला असावा. लोहगड घाटमाथ्याच्या शेजारी असल्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. त्यामुळे या गडावर अनेक राजवटींनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. या राजवटींमध्ये सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट व यादव या सारख्या मोठ्या राजवटींचा समावेश होता.

मलिक अहमदने इ.स 1489 साली निजामशाहीची स्थापना केली होती. त्यानंतरच्या काळात त्याने महाराष्ट्रातील अनेक गड जिंकून घेतले. या जिंकून घेतलेल्या गडांमध्ये लोहगडाचा सुद्धा समावेश होता. बराच काळ लोहगड निजामशाहीच्या ताब्यात होता. 1630 साली गडावर आदिलशहाने ताबा मिळवला त्यानंतर जवळपास स्वराज्यात गड येईपर्यंत आदिलशहाचे लोहगडावर वर्चस्व होते. तत्पू्र्वी इ.स 1654 मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण या निजामाला लोहगडावर कैद करण्यात आले होते.

Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात अनेक गड स्वराज्यात टप्याटप्याने सामील करून घेतले. कल्याण आणि भिवंडी हा सर्व परिसर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली जिंकून घेतला होता. त्याच काळात लोहगड व विसापूर हे दोन्ही गड शिवरायांनी स्वराज्यात सामील करून घेत गडांवर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला. गड जिंकून घेतल्यानंतर शिवरायांनी गडाची डागडुजी करत त्याच्या रचनेत थोडेफार बदल केले. त्यानंतर जवळपास 1665 पर्यंत लोहगड स्वराज्यातच होता. मात्र, इ.स 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि स्वराज्यातील अनेक गड मुघलांच्या स्वाधीन करावे लागले. या गडांमध्ये विसापूरसह लोहगडाचा सुद्धा समावेश होता.

लोहगडावरून दिसणारा विसापूर

मुघलांच्या ताब्यात गड गेल्यानंतर मराठ्यांनी तत्काळ हालचाल केली नाही. योग्य संधीची वाट पाहिली आणि 13 मे 1670 साली गडावर स्वारी करत मुघलांना पळवून लावले आणि गड पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटली, तेव्हा लुटून आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती. संपत्ती आणून ज्या ठिकाणी ठेवली होती ती जागा आजही लोहगडावर पाहता येते. पुढी 1713 साली शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिल्याची नोंद आढळून येते.

त्यानंतर लोहगड 1720 साली पेशव्यांच्या ताब्यात व 1770 साली नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले यांच्या ताब्यात देण्यात आला होता. जावजी बोंबले यांनी काही काळ गडाचा कारभार पाहिला. मात्र, त्यानंतर नाना फडणवीसांनी लोहगडाची जबाबदारी धोडोंपंत नित्सुरे यांच्याकडे सोपवली. धोडोंपंत नित्सुरे यांच्याकडे जबाबदारी सोपवल्या नंतर नानांनी गडाचे बांधकाम करून घेतले. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडावर असणारी सोळा कान असलेली एक बाव. ही बाव नाना फडणवीसांना धोडोंपंत नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बांधून घेतली होती.

सोळा कानांची ही बाव बांधून झाल्यानंतर तिच्या शेजारी एक शिलालेख कोरण्यात आला आहे. त्या शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे, “शके 1771 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधिवली.” नाना फडणवीसांचा लोहगडावर जास्त वावर होता. तसेच त्यांचे गडावर विशेष लक्ष सुद्धा होते. त्यामुळेच त्यांनी आपली सर्व द्रव्ये धोंडो बल्लाळ यांच्या निगराणीत गडावर आणली होती. धोंडो बल्लाळ हे मरेपर्यंत लोहगडावरच वात्सव्याला होता. गडावरच 1800 साली त्यांचे निधन झाले. पतीने निधन झाल्यानंतर धोडों बल्लाळ यांच्या पत्नी काही काळ गडावर वात्सव्याला होत्या.

Raju Patil – मनसेचा एकमेव आमदार पराभूत, कसा होता राजू पाटील यांचा संघर्ष, राज ठाकरेंच काय चुकलं; वाचा सविस्तर…

धोंडो बल्लार नित्सुरे यांचे निधन झाले आणि याच संधीचा फायदा घेत इंग्रजांनी वाईट नजर गडावर पडली. त्यांनी 1803 साली गड जिंकून घेतला. मात्र, त्यांचा हा आनंद दुसऱ्या बाजीरावाने क्षणार्धात हिरावून घेतला आणि लोहगड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर 1818 पर्यंत लोहगड स्वराज्यामध्येच होता. 3 मार्च 1818 रोजी जनरल प्रॉथर याने लोहगडाच्या शेजारी असणाऱ्या विसापूरवर आक्रमण केले व गड जिंकून घेतला. विसापूर गनीमांच्या हवाली गेल्यानंतर लोहगडावर असणाऱ्या मराठ्यांनी संख्याबळ कमी असल्यामुले लागलीच गड खाली केला. विसापूर ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 मार्च 1818 रोजी प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने लोहगड सुद्धा जिंकून घेतला.

गडाची सध्या अवस्था

गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा लोहगड समुद्र सपाटीपासून 2420 फूट उंचीवर आहे. गड चढण्यास अगदी सोपा आहे. शासनाच्या माध्यामातून गडाची डागडूजी करण्यात आली आहे. तसेच गडावर चढण्यास चांगल्या दगडाच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे गडावर जाणे अगदीच सोपे आहे. साधारण 20 ते 30 मिनिटांत आपण पायथ्यापासून गडावर पोहोचतो. गडाचा बुरूज सुस्थितीत असून गडावर असणारा विंचूकडा पाहण्यासारखा आहे. ज्या प्रकारे राजगडावर सुवेळा आणि संजीवनी माची आहे. अगदी त्याच प्रकारे लोहगडावर विंचूकडा आहे. गड पाहण्यास अगदी उत्तम असून लहान मुलांना आवर्जून या गडावर घेऊन जावे.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

गडावर चढण्यास दगडी पायऱ्या असल्यामुळे न दमता एका दमात गडावर चढता येते. गडाच्या एन्ट्रीलाच सापाच्या आकाराचा चार प्रवेशद्वारांचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रवेशद्वारांची रचना सर्पाकार स्वरुपाची आहे. गडावर चढताना तुम्हाला पहिला गणेश दरवाजा लागेल. या दरवाजातून आपली गडावर एन्ट्री होते. त्यानंतर आपल्याला लागतो तो नारायण दरवाजा आणि त्यानंतर हनुमान दरवाजा. हे तीन दरवाजे पार केल्यानंतर आपण गडाच्या मुख्य महादरवाजा जवळ पोहोचतो. महादरवाजावर हनुमानाची मुर्ती कोरण्यात आलेली पहायला मिळते. या तिन्ही दरवाजांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे थोडक्यात या दरवाजांचे वैशिष्ट्य आपण पाहू.

गणेश दरवाजा

1) गणेश दरवाजा – गडावर चढताना पहिल्यांदा आपल्याला गणेश दरवाजा लागतो. याच दरवाजाच्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आल्याचे सांगितले जाते. सावळे कुटुंबाचा नरबळी दिल्यानंतर त्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. दरवाजातून आतमध्ये आल्यानतंर दगडात कोरलेले काही शिलालेख लक्ष वेधून घेतात.

नारायण दरवाजा

2) नारायण दरवाजा – नाना फडणवीसांसाठी लोहगड म्हणजे जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळेच त्यांनी गडाची डागडूजी करून घेतली होती.  त्याच काळात त्यांनी नारायण दरवाजा बांधला असावा. या ठिकाणी एक भुयार असून या ठिकाणी भात व नाचणी साठवून ठेवली जाई. तसेच या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना व्याघ्रशिल्प कोरण्यात आलेले पहायला मिळतात.

हनुमान दरवाजा

3) हनुमान दरवाजा – लोहगडावरी सर्वात प्राचीन दरवाजा म्हणून हनुमान दरवाजाचा उल्लेख केला जातो. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शरभाच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत.

4 ) महादरवाजा – लोहगडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा. या दरवाजातून आपला गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर हनुमानाची मूर्ती कोरण्यात आली आहे.

सोळा कोणी तलाव

महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर समोरच दर्गा आणि दर्ग्याच्या शेजारी लोहारखानाचे भग्न अवशेष तुमच्या नजरेस पडतील. याच ठिकाणी ध्वजस्तंभ असून ध्वजस्तंभाच्या इथून उजवीकडे चालत गेल्याचे आपल्याला लक्ष्मीकोठी पहायला मिळते. या कोठीमध्ये अनेक खोल्या आहेत. याच कोठीमध्ये सुरतहून आणलेला खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवल्याचे सांगितले जाते. दर्ग्याच्या इथून मागच्या बाजूला चालत गेल्यास महादेवाचे मंदिर लागते. दर्शन घेऊन झाल्यानंतर विंचू कड्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे.

विंचूकडा

गडावर एक विशिष्ट आकाराचे तळे आहे. हे तळे सोळा कोनी असून याची बांधणी नाना फडणवीसांनी केली आहे. तसेच गडावर त्र्यंबक तलाव सुद्धा आहे.  याच ठिकाणाहून पुढे विंचूकड्याच्या दिशेने रस्ता गेला आहे. राजगडाची संजीवनी माची तशीच लोहगडाच विंचूकडा होय. विंचूकडा पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद असून याचे टोक विंचवाच्या नांगीसारखे दिसते. त्यामुळे या कड्याला विंचू कडा असे नाव देण्यात आले आहे.

गडावर जायचे कसे

पुणे किंवा मुंबईहून लोहगडाला येण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम लोणावळ्यामध्ये यावं लागणार आहे. लोणावळ्यातील मळवली स्थानकावर उतरल्यानंतर महामार्गाच्या पलीकडे लोहगड आहे. महामार्गावर छोटा ब्रीज बांधण्यात आलेला आहे. त्या ब्रीजवरून गाडी घेऊन आपल्याला लोहगडाच्या दिशेने जाता येते. लोहगडाच्या दिशेने जाताना वाटेत विसापूर आणि भाजे लेण्या सुद्धा पाहता येतात. शक्य झाल्यास लोहगड आणि विसापूर एकाच दिवसात करता येतो. मात्र, लोहगडाच्या तुलनेत विसापूर चढण्यास थोडा अवघड आणि मोठा आहे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. मात्र, गडाच्या पायथ्याला असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. परंतु गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. गडावर असलेलेल्या लक्ष्मी कोठीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. परंतु गडावर रहाण्यास सध्या बंदी आहे. त्यामुळे चौकशी करूनच गडावर मुक्काम करण्यास जावे. गडावर तळे आहे. परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे का नाही. याबाबत खात्रीशिर माहिती उपलब्द नाही. त्यामुळे गडावर जाताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन जावे.

हे ही लक्षात ठेवा

1) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
2) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
3) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
4) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा.

Leave a comment